आंबा घाटात ३०० फूट खोल दरीत कार कोसळली; चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 02:23 PM2022-01-12T14:23:26+5:302022-01-13T11:11:37+5:30
अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आंबा : येथील घाटातील विसावा पॉईटवरुन कार तीनशे फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक ठार झाला. संजय गणेश जोशी (वय-६०, रा. राजारामपुरी, ५ वी गल्ली, कोल्हापूर.) असे त्यांचे नाव आहे. अपघात सकाळी अकराच्या सुमारास झाला. या अपघाताची साखरपा पोलीस ठाण्यात नोंद झाली.
अधिक माहिती अशी की, आज सकाळी जोशी हे घाट उतरताना त्यांची मोटार (नं एमएच ०९ डी. ए.१०९९) विसावा या प्रेक्षणीय पॉईंटवर रस्ता सोडून पन्नास फूट दरीकडे जाऊन सुमारे तीनशे फूट दरीत कोसळली. तिसऱ्या टप्प्यावर जोशी गाडीतून बाहेर फेकले गेले व ओघळीत कोसळले. गाडीच्या अलीकडे पन्नास फुटांवर त्यांचा मृतदेह पडला होता. डोके फुटल्याने मोठा रक्तस्त्राव झाला होता. कार दरीच्या तळात जाऊन विसावली.
बारा वाजता साखरपा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आंबा व साखरपा येथील मदत पथके झुडपांचा आधार घेत दरीत उतरले. बारा ते चार अशा चार तासांच्या अथक प्रयत्नाने मृतदेह बाहेर काढला गेला. या मदतकार्यात राहुल गायकवाड, राजू काकडे, आंबा येथील दिनेश कांबळे, दिग्विजय गुरव, सुनील काळे, राहुल बोंडे, अक्षय महाडिक, राजेश गायकवाड यांनी योगदान दिले.
विसावा पॉईंटला बांधलेले लोखंडी ग्रिल दोन वर्षांपासून दुरवस्थेत आहे. ते मजबूत असते तर दुर्घटना टळली असती. पाच वाजता मृतदेह साखरपा रुग्णालयात शवविच्छेदनास नेला. देवरूखचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव, पी. एस. आय. विद्या पाटील तपास करीत आहेत.