खेड : तालुक्यातील मोहाने गावातील तळेवाडी येथे जर्सी जातीच्या गायीला विषारी द्रव्य खायला घालून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित पती-पत्नीविरोधात खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. २४ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
तालुक्यातील मोहाने गावात दि. २४ रोजी सकाळी ९.३० वाजता एका गायीचा मृत्यू झाला. याप्रकरणी दीपक लक्ष्मण साबळे (४६, रा. मोहाने तळेवाडी) यांनी पाेलीस स्थानकात फिर्याद दिली. गावात त्यांच्या शेजारी राहणारे विशाल राजाराम चिकणे आणि त्यांची पत्नी रेश्मा (दोन्ही रा. मोहाने, ता. खेड) यांनी घराभोवती निगडीच्या वनस्पतीचे कंपाऊंड केले आहे. या दोन घरांमध्ये असलेल्या मोकळ्या जागेतून साबळे गाया चरण्यासाठी घेऊन जात हाेते. कंपाऊंडसाठी वापरलेली निगडी वनस्पती त्यांनी खाल्ल्याचा राग मनात धरून संशयित पती-पत्नी यांनी संगनमताने या रस्त्यावर पांढऱ्या रंगाचे विषारी द्रव्य टाकले, असे दीपक साबळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. हे द्रव्य जर्सी गायीने खाल्ल्यामुळे विषबाधा होऊन गायीचा मृत्यू झाला, असे तक्रारीत म्हटले आहे आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजय येलकर करीत आहेत.