काजूच्या चिकापासून औषध निर्मिती, औषधी गुणधर्म सिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 12:37 PM2019-11-15T12:37:00+5:302019-11-15T12:38:20+5:30
काजूच्या चिकापासून औषध निर्मिती करणे शक्य असून, सावर्डे येथील फार्मसी कॉलेजच्या भाग्यश्री चोथे हिने त्यातील औषधी गुण सिद्ध केले आहेत. या संशोधनासाठी भारत सरकारने तिला नुकतेच पेटंट प्रदान केले आहे. भाग्यश्री ही मूळची सांगली येथील असून, ती सध्या गोवा येथे एका कंपनीत सेवा बजावत आहे.
चिपळूण : काजूच्या चिकापासून औषध निर्मिती करणे शक्य असून, सावर्डे येथील फार्मसी कॉलेजच्या भाग्यश्री चोथे हिने त्यातील औषधी गुण सिद्ध केले आहेत. या संशोधनासाठी भारत सरकारने तिला नुकतेच पेटंट प्रदान केले आहे. भाग्यश्री ही मूळची सांगली येथील असून, ती सध्या गोवा येथे एका कंपनीत सेवा बजावत आहे.
कोकणात मोठ्या प्रमाणात काजूचे पीक घेतले जाते. हजारो हेक्टर क्षेत्र काजू लागवडीने व्यापलेले असून, त्याला आता सरकारी अनुदानातूनही तितकाच हातभार लागत आहे. त्यामुळे कोकणात काजूच्या लागवडीचे प्रमाण वाढलेले असतानाच उत्पन्नही तितक्याच पटीत शेतकरी घेत आहेत. कोकणातील काजूला तितकीच मागणी असून, अत्याधुनिक फळ प्रक्रियेमुळे येथे काजूचे नवीन उद्योगही मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत.
तसे पाहिले तर काजूपासून काजूगर, ड्रायफूट्स म्हणून उपयोग होतो. शिवाय काजूच्या बोंडापासून मद्य तयार केले जाते. याविषयी दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाने संशोधन केले आहे. तसेच काजूच्या बोंडापासून तयार केली जाणारी काजू फेणी हे मद्य गोव्यात तितेकच प्रसिद्ध आहे. मात्र, आता काजूच्या खोडापासून निघणाऱ्या चिकात पॉलिमर हा औषधी गुण असल्याचे भाग्यश्री चोथे हिने सिद्ध केले आहे.
या औषधी गुणधर्मामुळे एखाद्या औषधाचा परिणाम २४ तास राहू शकतो, असेही या संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळे भविष्यात काजूच्या चिकाची मागणी वाढून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. या संशोधनासाठी प्रा. माया देसाई व प्रा. प्रवीण वाघचौरे यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, सचिव अशोक विचारे, प्राचार्य डॉ. अनिल बत्तासे यांनी अभिनंदन केले आहे.