रत्नागिरी : तालुक्यातील चांदेराई येथे कोविड योद्ध्याला सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ व आरडाओरड केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमाराला घडली, तसेच त्याच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकाविरोधात ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निहार अहमद सुलेमान मुकरी (रा. इब्राहिमपट्टण चांदेराई, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात इस्माईल इब्राहिम खान (३९,रा. इब्राहिमपट्टण चांदेराई, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या तक्रारीनुसार गुरुवारी ते जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ कोविडमुक्त रत्नागिरी या मोहिमेचे काम करत होते. तेव्हा त्यांना निहार मुकरी सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क न लावता फिरताना दिसला. इस्माईल खान यांनी त्याला हटकले असता, त्याने सार्वजनिक ठिकाणी त्यांना शिवीगाळ व आरडाओरड करत त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे त्याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस हेड काॅन्स्टेबल सावंत करत आहेत.