दापोली : राजर्षी शाहू महाराजांचे विचार तथा कर्तृत्व सामान्यजणांपर्यंत पोहाेचवण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद आदर्श शाळा वाकवली नं.१ चा विद्यार्थी फरहान जावेद शेख याने कॉ. गोविंद पानसरे लिखित राजर्षी शाहू वसा आणि वारसा या पुस्तकाच्या २६ प्रती स्वतःला खाऊसाठी दिलेल्या खर्चातून बचत केलेल्या रकमेतून खरेदी करून वाटप केल्या.
राजर्षी शाहू महाराज म्हणजे बहुजन समाजाला सोबत घेऊन जाणारे महानायक, आरक्षणाचे जनक, बालकांचा शिक्षणाचा मूलभूत हक्क शंभर वर्षांपूर्वीच ज्यांनी जोपासला अशा दूरदृष्टी महानायकाच्या जीवनप्रवासाने फरहान प्रभावित झाला आहे. त्यांच्या ध्येय धोरणांशी प्रेरित होऊन राजर्षी शाहू महाराज यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्याचे त्याने ठरविले. मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढली पाहिजे यासाठी त्याने खाऊसाठी दिलेल्या पैशातून पुस्तके खरेदी केली़ शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी या पुस्तकांचे त्याने वाटप केले.
या समाजपूरक कृतीने सामान्यजणांत नवीन आदर्श प्रस्थापित झाला आहे. महापुरुषांचे विचार आणि सामाजिक कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी असे उपक्रम राबवले गेले पाहिजेत, असे मत नागरिकांतून मांडले जात आहे.