राज्यभरात २६ जूनला चक्का जाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:22 AM2021-06-24T04:22:20+5:302021-06-24T04:22:20+5:30
रत्नागिरी : ओबीसींच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम महाराष्ट्र सरकार करीत आहे, असा आरोप करीत ओबीसी आरक्षण रद्द करण्याच्या ...
रत्नागिरी : ओबीसींच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम महाराष्ट्र सरकार करीत आहे, असा आरोप करीत ओबीसी आरक्षण रद्द करण्याच्या विरोधात २६ जूनला राज्यभरात १००० ठिकाणी भाजपतर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजपच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, मागासवर्ग आयोग स्थापन करण्याची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पडून होती, अशी धक्कादायक माहिती आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे गेले १४ महिने मागासवर्ग आयोगाची फाईल पाडून ठेवली होती. २२ दिवसांपूर्वी वडेट्टीवार यांनी सांगितले होते की मागासवर्ग आयोग स्थापन करतो. इम्पेरिकल डाटा बनवितो. तो तयार झाला नाही. तसेच चार दिवसांपूर्वी त्यांनी सांगितले होते की, जोपर्यंत ओबीसींचा आयोग स्थापन होत नाही तोपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नाही. हे सर्व ते मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने बोलले. मंगळवारी निवडणूक आयोगाने ८५ जिल्हा परिषदा आणि १४५ पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर केल्या. याचाच अर्थ ओबीसींच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचे काम या राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तत्काळ राजीनामा देण्याची आपली मागणी आहे, असे त्या म्हणाल्या.
ज्या पद्धतीने मराठा समाजासोबत केले, त्याच पद्धतीने ओबीसींच्या आरक्षणासोबत खेळण्याचा त्यांचा राजकीय डाव आहे. तो आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही. मराठा समाजाच्या विरोधात आम्ही कधीही नाही. आमच्यामध्ये दुफळी माजविण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. मराठा समाजाला त्यांचे आरक्षण मिळालेच पाहिजे. त्याचबरोबरीने ओबीसींचे आरक्षण हे पूर्ववत व्हायलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. आज सर्वांनी एकत्रित येऊन ताबडतोब सुप्रीम कोर्टात जाऊन या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी करणे आवश्यक आहे. हे न करता आंदोलने, चिंतन बैठका सुरू आहेत. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकही शब्द बाेलत नाहीत. सरकारची भूमिका फसवी व डोळ्यात धूळ फेकणारी आहे हे राज्यातील जनता पाहत आहे. म्हणूनच वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, माजी आमदार विनय नातू, राजेश सावंत, राजन कापडी व अन्य उपस्थित होते.