रत्नागिरी : सुनील तटकरे यांचे दापोलीत सुतोवाच, रायगडमध्ये परिवर्तन निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:43 PM2019-01-10T13:43:58+5:302019-01-10T13:46:13+5:30
गेल्या लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात असणारी परिस्थिती कमालीची बदलली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष व समविचारी पक्षांची आघाडी यंदा रायगड मतदारसंघात परिवर्तन घडवणार असल्याचा विश्वास सुनील तटकरे यांनी येथे व्यक्त केला. दापोलीतील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते.
दापोली : गेल्या लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात असणारी परिस्थिती कमालीची बदलली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष व समविचारी पक्षांची आघाडी यंदा रायगड मतदारसंघात परिवर्तन घडवणार असल्याचा विश्वास सुनील तटकरे यांनी येथे व्यक्त केला. दापोलीतील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला अत्यल्प मतांनी पराभव स्वीकाराला लागला होता. हा फरक यावेळी आपण लिलया भरून काढू. कारण गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी देशात मोदींची लाट होती. ती आता पूर्णपणे ओरसली आहे. विरोधक सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असल्याने त्यांनी जनतेची तेव्हाची सहानुभूती गमावली आहे.
विरोधकांच्या फसव्या राजकारणाला आता जनता कंटाळली आहे. यामुळे आगामी निवडणुकांसाठी गेल्यावेळेपेक्षा अगदी विरूध्द वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे यंदा रायगड लोकसभा मतदारसंघात निश्चितपणे परिवर्तन होणार असल्याचे सांगितले.
गेल्यावेळी या मतदार संघातून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी आपली निष्क्रीयता दाखवून रायगडमधील मतदारांचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे आता जनता मतदानाच्या दिवसाची वाट पाहत आहे. यावळी मतदार कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाहीत. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाची आपल्याला भक्कम साथ मिळाली आहे.
राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होणार, हे निश्चित असल्याने आत्तापासूनच विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघात परिवर्तन निश्चित असून, येथे राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाल्याशिवाय राहणार नाही, असे तटकरे यावेळी म्हणाले.