अरुण आडिवरेकर रत्नागिरी : बहुतांश खाद्य पदार्थांमध्ये आवश्यक असणारा कांदा १५० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणले. मात्र, रत्नागिरीच्या बाजारपेठेत बारामतीचा कांदा ५० ते ७० रुपये दराने मिळू लागल्याने अनेकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.यावर्षी पडलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेला कांदा शेतात सडून गेल्याने नवीन कांदा बाजारात येतच नसल्याने आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. काही शेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा सध्या बाजारात येत आहे. घाऊक बाजारात कांद्याने क्विंटलला दहा हजाराचा टप्पा ओलांडल्याने किरकोळ बाजारात हाच कांदा १५० रुपये किलोने विकला जात आहे. कांद्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. हॉटेल आणि उपाहारगृहात कांदा काटकसरीने वापरला जात आहे.रत्नागिरीत गेल्या २ दिवसांपासून कुवारबाव ते आठवडा बाजार परिसरात कांदा विक्री करणाऱ्या गाड्या दाखल झाल्या आहेत. या गाड्यांवर मिळणारा कांदा ५० ते ७० रुपये दराने विकला जात होता. लहान आकाराचा कांदा ५० रुपये, मध्यम आकाराचा ६० रुपये तर मोठा कांदा ७० रुपयाने होता. ५० रुपये प्रतिकिलो दराने १० किलोची पोती विक्रीला ठेवली होती, तर किरकोळही कांदा दिला जात होता. कमी दरात कांदा उपलब्ध झाल्याचे कळताच अनेकांनी कांदा खरेदीसाठी गर्दी केली होती.रत्नागिरीत विक्रीसाठी आलेला हा कांदा बारामती येथील असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तेथून कांदा सातारा येथील लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीत येतो. स्वस्त दरामुळे हा कांदा खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडाली होती. रत्नागिरी शहराप्रमाणेच कुवारबाव येथेही कांदा विक्रीला मोठा प्रतिसाद मिळाला.आचारसंहितेमुळे उठवलेकांदा विक्री करणाऱ्या गाड्या शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषद कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर उभ्या केल्या होत्या. नगर परिषद कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच ते तेथे दाखल झाले. नगर परिषदेची निवडणूक आहे, आचारसंहिता आहे तुम्हाला गाड्या लावता येणार नाहीत, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर हे विक्रेते तिथून निघून गेले.लोणंद समिती प्रसिद्धराज्यात सातारा जिल्ह्यातील लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव या तालुक्यांमधील कांदा विक्रीसाठी येतो. तसेच पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर आणि बारामती तालुक्यातील कांदाही लोणंदमध्येच विक्रीसाठी आणला जातो.
बारामतीचा स्वस्त कांदा विक्रीसाठी रत्नागिरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 1:00 PM
बहुतांश खाद्य पदार्थांमध्ये आवश्यक असणारा कांदा १५० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणले. मात्र, रत्नागिरीच्या बाजारपेठेत बारामतीचा कांदा ५० ते ७० रुपये दराने मिळू लागल्याने अनेकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.
ठळक मुद्देबारामतीचा स्वस्त कांदा विक्रीसाठी रत्नागिरीतआचारसंहितेमुळे उठवले