चिपळुणच्या हद्दीत लवकरच श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 04:36 PM2019-01-16T16:36:47+5:302019-01-16T16:40:55+5:30
चिपळुण नगरपरिषदेत हद्दीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी शासनाच्या कला संचालनालयाने मंजुरी दिली असून पुतळा उभारण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या कामी येणारा १ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर हे करणार आहेत.
रत्नागिरी : लोकप्रतिनिधी तसेच जनतेच्या मागणीनुसार चिपळुण नगरपरिषदेत हद्दीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाच्या कला संचालनालयाने याला मंजुरी दिली असून पुतळा उभारण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असून या कामी सुमारे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार असून पुतळ्याचा खर्च रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर हे स्वत: करणार आहेत.
चिपळूण नगरपरिषदेच्या हद्दीत स्वमालकीच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक जनतेकडून करण्यात येत होती. त्यानुसार चिपळुण नगरपरिषदेच्या दिनांक १० सप्टेंबर २०१८ च्या मुख्य सभेत (ठराव क्रमांक ६७) याबाबतचा ठराव पारीत करण्यात आला.
हा पुतळा उभारणेकामी होणाऱ्या खर्चास नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासकीय व आर्थिक मंजुरीही देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी देखील नगरपरिषदेने ठरावाद्वारे घेतली आहे. परंतु पुतळा उभारण्यासाठी राज्य शासनाच्या काला संचालनालयाकडून आवश्यक ती परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याने पुतळा उभारण्याचे कामही रखडले होते.
याप्रश्नी पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी कला संचालक मिश्रा यांच्या समवेत बैठक घेतली. या बैठकीनंतर कला संचालनालयाने १५ जानेवारी रोजी पुतळा उभारण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे चिपळुण नगरपरिषदेत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून फेबु्रवारीच्या अंतिम आठवडयात पुतळा उभारण्याचे काम पुर्ण करण्यात येणार आहे.
हा पुतळा पालकमंत्री स्वखर्चाने उभारणणार असून, पुतळ्यासाठी आवश्यक चौथरा तसेच सभोवतालील सुशोभिकरण व अन्य कामांसाठी सुमारे रुपये १ कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात येणार असल्याची माहितीपालकमंत्री रविंद्र वायकर यांनी दिली.