चिपळूण : शहरातील गुहागर नाका मच्छीमार्केट परिसर, आफ्रीन अपार्टमेंटमधील ७ फ्लॅट, रश्मी प्लाझा, हजिरा पॅलेस, पेठमापमधील शाहीन अपार्टमेंट या परिसरात मंगळवारी रात्री एकूण १७ बंद फ्लॅट फोडून १ लाख ६१ हजार २७६ रुपयांचा ऐवज चोरट्याने लांबविला आहे. या परिसरात श्वानपथकाला पाचारण करण्यात आले.शहरातील गुहागर नाका मच्छीमार्केट व पेठमाप परिसरातील सर्व फ्लॅट बंद होते. मंगळवारी एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी कटावणीच्या सहाय्याने दरवाजांचे कडीकोयंडे तोडून आतमध्ये प्रवेश केला. फ्लॅटमधील गोदरेजची कपाटे फोडून सोने, चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरुन नेली.
रश्मी प्लाझा येथील अॅड. अल्ताफ दलवाई, हजरत रुमानी तौफीक यांचा फ्लॅट फोडण्यात आला आहे. हजिरा पॅलेसमधील अब्दुल रहिमान इब्राहिम घारे, तसेच आफ्रीन अपार्टमेंटमधील समीर फकीर महंमद यांचा फ्लॅट फोडून ९ हजार रुपये चोरुन नेले.रहिमा अखिल चौगुले, समीरा बिलाल सरगुरोह यांचा फ्लॅट फोडून ९ हजार रुपये, इरफान वावेकर, शफीर सरगुरोह, अक्रम गुलजार खान यांचे १४ हजार रुपये, मुबीन रुमाने, शबनम अपार्टमेंटमधील नदीम दिवेकर, साजीद सुर्वे, तंजुमन चौगुले, आफ्रीन अपार्टमेंटमधील अब्दुल कादीर गुलजार खान, मुबीन बशीर सुर्वे, जोहरा हमीद तांबे, जहिदा नायकवडी या उर्दू माध्यमाच्या निवृत्त शिक्षिका असून, त्या रत्नागिरी येथे गेल्या होत्या. त्यामुळे त्यांचा फ्लॅट बंद होता. त्यांच्या फ्लॅटमधून रोख रक्कम व दागिने असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.