मुलांची शोधमोहीम तीव
By admin | Published: February 5, 2016 10:34 PM2016-02-05T22:34:21+5:302016-02-05T23:42:25+5:30
जिल्हा परिषदेचा उपक्रम : २२ ठिकाणी घेणार शोध्र
रत्नागिरी : जिल्ह्यातील चिरेखाणी, बांधकाम, क्रशर, झोपडपट्ट्या अशा एकूण २२ ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या मोहिमेचा शुभारंभ केला असून, ती १५ फेबु्रवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे.
गरीब, गरजू, रस्ता कामगार, सफाई कामगारांच्या प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे, तसेच शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे प्रत्येक मूल शिक्षण प्रवाहात येऊन त्याचे भवितव्य घडविण्याच्या दृष्टीने शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रस्ता कामगारांच्या शाळाबाह्य मुलांच्या प्रवेशावरून रत्नागिरी पंचायत समितीमध्ये जोरदार चर्चा झाली होती. कारण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निवळीतिठाच्या मुख्याध्यापिकेवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली होती.
त्यामुळे शाळा बंद आंदोलनासह शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात होते. मात्र, निलंबन रद्द केल्यानंतर त्या मुख्याध्यापिकेला विभागीय चौकशीला सामोरे जावे लागले असल्याने हे प्रकरण पंचायत समितीच्या सभेत जोरात गाजले होते.
मागील पंधरावड्यामध्ये जिल्ह्यात ८३ शाळाबाह्य मुलांना शिक्षण विभागाने शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. त्यानंतर मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही शोधमोहीम यशस्वी होण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने संभाव्य २३ ठिकाणांवर सर्व्हेक्षण करण्याची सूचना शिक्षण विभागाने दिली
आहे.
या मोहिमेमुळे प्रत्येक मूल शाळेत जाणार असून, गरिबांनाही शिक्षण घेता येणार आहे. मोफत शिक्षणातून त्यांचे भवितव्य घडविण्यात मोठी मदत होणार आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे प्रयत्न सुरु आहेत. (शहर वार्ताहर)
शिक्षणाच्या प्रवाहात : सर्वेक्षण करावयाची संभाव्य ठिकाणे
झोपडपट्टी, चिरेखाणी, इमारत बांधकाम, धरण प्रकल्प, रस्ता चौपदरीकरण, आंबा-काजू बागायती, क्रशर, रेल्वे स्थानक, बसस्थानके, आठवडा बाजार, तालुका व गावाचे मध्यवर्ती ठिकाण, पुलाचे काम, बीएसएनएल केबलची कामे, पाण्याच्या पाईपलाईनची कामे, इतर चालू प्रकल्प, कातभट्ट्या, कोळसा भट्ट्या, हॉटेल्स, घरकाम, दुकाने व संस्था, फिरते विक्रेते आदी ठिकाणी हा शोध घेण्यात येणार आहे. याठिकाणी शिक्षण बाह्य विद्यार्थी सापडल्यास त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
चिरेखाणींसह दुकाने, हॉटेल्सचे सर्वेक्षण होणार.
शोधमोहीम १० दिवस राबविणार.
शुक्रवारपासून शोधमोहिमेचा शुभारंभ.
मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न.