लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : शहर आणि तालुक्यासाठी कोविड लस उपलब्ध झाली असून, चिपळूणमधील चार खासगी रुग्णालयांमध्ये ही लस सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध केली आहे. तसेच शासनाकडून मोफत लस दिली जात असून, आतापर्यंत तालुक्यातील १४,३०७ जणांनी कोविडची लस घेतली आहे. बहुतांशी शासकीय कर्मचाऱ्यांनी लसीचे उद्दिष्ट साध्य केले आहे. मात्र अजूनही नागरिकांमधून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.
काही दिवसांपूर्वीच भारतीय बनावटीची कोविड लस येथे उपलब्ध झाली आणि लसीचे वितरण सुरू झाले. परंतु प्रथम आरोग्य कर्मचारी तसेच अन्य शासकीय कर्मचाऱ्यांना, कोविड योद्धा यांना ही लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांना तसेच कोरोना काळात अग्रस्थानी काम करणाऱ्या महसूलच्या व नागरिकांना लस देण्याचे काम पहिल्या टप्प्यात करण्यात आले, तर दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी लस दिली जात आहे.
आतापर्यंत ६० पेक्षा अधिक वयोगटातील ३७,२९९ पैकी अवघ्या ९,४९० जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच ४५ ते ५९ वयोगटातील ६,३०७ जणांपैकी ५९४ जणांनी लस घेतली आहे. त्याचबरोबर आरोग्य यंत्रणेतील ४३९ कर्मचाऱ्यांपैकी ३९९ जणांनी पहिला, तर ३६४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. महसूल विभागातील १२४ जणांपैकी ११७, १५५ जणांपैकी १४३ पोलीस, तर पंचायत समिती कर्मचारी ६७४ पैकी ३७८ जणांनी आतापर्यंत लस घेतली आहे.
चौकट
अंगणवाडी सेविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अजूनही शासकीय कर्मचारी व शिक्षकांना लस देण्याचे काम सुरू आहे. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत अंगणवाडी सेविका यांच्याकडून सर्वाधिक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तालुक्यातील ६७५ अंगणवाडी सेविकांपैकी ६२१ महिलांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे.
चौकट
खासगी रुग्णालयांमध्ये थंडा प्रतिसाद
आता खासगी रुग्णालयांमध्येही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. चिपळूणमध्ये लाईफ केअर हॉस्पिटल, डेरवण रुग्णालयात, एसएमएस हॉस्पिटल व अपरांत हॉस्पिटल या चार खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण सुरू आहे. या रुग्णालयांमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या २५० रुपये शुल्कात कोविड लस दिली जात आहे. परंतु, अजूनही अपेक्षित असा प्रतिसाद मिळालेला नाही.
कोट (सिंगल फाेटाे आहे)
शासकीय रुग्णालय व खासगी रुग्णालयांमध्ये समाजातील सर्व घटकांसाठी लस उपलब्ध झाली आहे. बहुतांशी शासकीय कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. मात्र, अजूनही नागरिकांकडून शासकीय किंवा खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. नागरिकांनीही कोणतेही गैरसमज मनात न ठेवता लसीकरणाचा लाभ घ्यायला हवा.
- डॉ. ज्योती यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिपळूण.