चिपळूण : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या चिपळूण विभागाच्या अख्यतारीत ठेकेदारांची ५० कोटी रुपयांची बिले थकीत असल्याने ठेकेदारांसह सुशिक्षित बेरोजगार अभियंते अडचणीत आले आहेत. या बिलांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. मात्र, अद्याप ठेकेदारांना बिले मिळालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर बुधवारी ठेकेदार व सुशिक्षित बेरोजगार अभियंते कार्यालयात थडकले आणि त्यांनी कार्यकारी अभियंता उत्तमकुमार मुळे यांची भेट घेऊन जाब विचारला.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यतारीत रस्ते, पूल, साकव यासारखी कामे केली जातात. याकरिता शासनाकडून निधी उपलब्ध केला जातो. मात्र, काही वेळा वेळेत निधी उपलब्ध न झाल्यास ठेकेदार अडचणीत येतात. यानुसार गेल्या वर्षापासून ठेकेदारांनी आत्तापर्यंत केलेल्या कामांची ५० कोटी रुपयांची बिले सार्वजनिक बांधकाम खात्याकडे थकीत राहिली आहेत.
ही बिले मिळावी यासाठी ठेकेदारासह सुशिक्षित बेरोजगार अभियंते सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र, मार्चअखेर आला तरी बिले अजून मिळाले नाहीत. यामुळे ठेकेदारांसमोर आर्थिक प्रश्न उभे राहिले आहेत. त्यामुळे बँकांच्या थकीत कर्जासह कामगारांची बिले भागविणे अवघड बनले आहे. यामुळे ठेकेदारांसह सुशिक्षित बेरोजगार अभियंते अडचणीत आले आहेत.या पार्श्वभूमीवर बुधवारी येथील ठेकेदारासह सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी कार्यकारी अभियंता मुळे यांची भेट घेऊन जाब विचारला. थकीत बिले येत्या काही दिवसांत मिळाली पाहिजेत, अशी आग्रही मागणी केली. अन्यथा, आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही दिला. यानंतर कार्यकारी अभियंता मुळे यांनी येत्या मार्च अखेरपर्यंत आपली मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.यावेळी चिपळूण तालुका ठेकेदार संघटनेचे सुरेश चिपळूणकर, रत्नागिरी जिल्हा सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष विशाल शेले, जिल्हाध्यक्ष रणजीत डांगे, अभिजीत जाधव, गणेश कांबळे मंगेश माटे आदी उपस्थित होते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कामांचे प्रमाणही कमी झाले आहे. मात्र कामगारांचे पगार द्यावेच लागत आहेत. ही अडचण अनेक ठेकेदारांसमोर असून, वेळेत बिले मिळाण्यासाठी आंदोलनाची तयारीही ठेवण्यात आली आहे.