चिपळूण : थकबाकीदाराकडे करवसुली पथकाला शिवीगाळ करत धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी (३ मार्च) चिपळूण शहरातील मच्छीमार्केट येथे घडला. या प्रकारानंतर वसुली पथकातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत शासकीय कामात अडथळा आणला म्हणून नगर परिषदेकडून पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.चिपळूण नगर परिषदेतर्फे शहरात करवसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. त्यासाठी एकूण १० पथके कार्यरत करण्यात आली असून, अद्यापपर्यंत २९ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १० जणांनी पूर्ण तर ३ जणांनी अर्धे पैसे भरून मुदत घेतल्याने या मालमत्ता मुक्त करण्यात आल्या आहेत. वसुली पथकाने अद्यापपर्यंत ८ कोटी ७० लाख इतकी वसुली केली आहे. ७ कोटी ३० लाख रुपये थकबाकी राहिली आहे. दोन प्रकरणे न्यायालयीन असून, त्यामध्ये १ कोटी ३० लाख रुपये थकीत आहेत.वसुली पथक शुक्रवारी मच्छीमार्केट परिसरात वसुलीसाठी गेले होते. तब्बल ४ वर्षे पाणीपट्टी थकीत असलेल्या नागरिकाकडे वसुलीसाठी पथक जाताच त्याने पथकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच कर्मचाऱ्यांना धमकी दिली. याबाबत वसुली पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना कल्पना दिली. त्याप्रमाणे त्यांनी संबंधित नागरिकाची तक्रार चिपळूण पोलिस स्थानकात दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.थकबाकीदारांची नावे जाहीर करणारनगर परिषदेकडून ७ मार्चपासून वसुली मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. नगर परिषदेने जप्त केलेल्या मालमत्तांची यादी प्रकाशित करून नियमानुसार मुदत देऊन लिलावाची कारवाई केली जाणार आहे. वारंवार नोटीस देऊन, भेट, विनंती करूनही अद्याप न भरणाऱ्या थकबाकीदारांची नावे जाहीररीत्या थकबाकीसहित प्रकाशित केली जाणार आहेत. थकीत पाणीपट्टीदारांचेही नळ कनेक्शन खंडित केले जाणार आहे.
Ratnagiri News: चिपळूण नगर परिषदेच्या वसुली पथकाला धमकी, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 6:45 PM