चिपळूण : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानात चिपळूण नगर परिषदेला ५० हजार ते १ लाख लोकसंखेच्या वर्गवारीत पश्चिम विभागातील पाच राज्यामधून (महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान व मध्यप्रदेश) मधून १० वे मानांकन मिळाले. तर महाराष्ट्रातून ६ वे आणि कोकण विभागातून प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे.गेल्या काही वर्षापासून केंद्र व राज्य सरकारच्या स्वच्छता अभियान अंतर्गत चिपळूण नगरपरिषद सातत्याने प्रयत्न करीत आहे. दोन वर्षापासून मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेबाबत शहरात विविध उपाययोजना व उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या साधनसामुग्रीद्वारे स्वच्छतेविषयी कायम स्वरूपी उपाययोजनाही केल्या आहेत. शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे बंदिस्त घंटागाडी द्वारे शंभर टक्के संकलन केले जाते. त्यानंतर शहरातील शिवाजीनगर येथील कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करण्यात येते. त्यातील ओल्या कचऱ्यापासून खत व बायोगॅस द्वारे वीज निर्मिती केली जात आहे. त्याशिवाय खत विक्री, सुका कचरा वेगवेगळ्या कंपार्टमेंट वर्गीकृत करून वेंडर ना पुढील प्रक्रियेसाठी विक्री, सिंगल युज प्लास्टिक बंदी, घरगुती घातक कचऱ्यावर प्रक्रिया करणे, मैला संकलन करणे व त्यावर शात्रोक्त रित्या प्रक्रिया, सामुदायिक व सार्वजनिक शौचालयची स्वच्छता, दिवसा रहिवासी क्षेत्राची साफ-सफाई व व्यापारी क्षेत्राची सकाळी व रात्री अशी दोनदा सफाई केली जाते. रात्रीच्या वेळी बाजारपेठेतील कचरा उचलण्यासाठी संकलीत करण्यासाठी स्वतंत्र घंटागाडीची व्यवस्था नगर परिषदेमार्फत केली जात आहे. या साऱ्या उपक्रमांची दखल केंद्र शासनाकडून दखल घेण्यात आली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत चिपळूण नगर परिषदे मार्फत नागरीकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती देखील करण्यात आली होती. केंद्र शासनामार्फत नियुक्त केलेल्या त्रयस्त संस्थेमार्फत शहराची स्वच्छतेची पाहणी करण्यात आली होती. तसेच नागरिकांच्या स्वच्छतेबाबत प्रतिक्रिया घेण्यात आल्या होत्या. त्यानुसार कचरा मुक्त शहराचे तारांकित मानांकन म्हणून १ स्टार व हागणदारी मुक्त शहर म्हणून ओडीएफ प्लस प्लस मानांकन सुध्दा प्राप्त झाले आहे. नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद सुद्धा चिपळूण शहराचे मानांकन वाढविण्यासाठी मोलाचा ठरला.प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, कार्यालयीन अधीक्षक अनंत मोरे, बांधकाम अभियंता प्रणोल खताळ, पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता नागेश पेठे, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक महेश जाधव आदींसह कर्मचाऱ्यांचे कौतूक होत आहे.
स्वच्छता अभियानात चिपळूण नगरपरिषद अग्रेसर ठरण्यासाठी नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी व शहरातील सामाजिक संस्था, महिला बचत गट व नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. सर्वांच्या सांघीक प्रयत्नामुळेच हे यश मिळाले आहे. हे चिपळूण नगरपरिषदेलाच नव्हे तर संपुर्ण शहरातील नागरिकांना मिळालेले मानांकन आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये कचरा मुक्त शहर म्हणून 3 स्टार मानांकन मिळवण्याचा मानस आहे. - प्रसाद शिंगटे, मुख्याधिकारी