चिपळुणात वाशिष्ठी, शिवनदीने धोक्याची पातळी ओलांडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:22 AM2021-06-18T04:22:32+5:302021-06-18T04:22:32+5:30
चिपळूण : शहरासह तालुक्यात बुधवारी काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदीला पूर आला. रात्री तीनच्या सुमारास शहरातील बाजारपेठेसह विविध भागात ...
चिपळूण : शहरासह तालुक्यात बुधवारी काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदीला पूर आला. रात्री तीनच्या सुमारास शहरातील बाजारपेठेसह विविध भागात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. पहाटे पावसाचा जोर ओसरल्यानंतर पुराचे पाणी ओसरले. पूरस्थितीमुळे गणेश विसर्जन घाटाशेजारील सहा कुटुंबांना शेजारच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले हाेते. पावसाचा जाेर वाढल्याने मुख्याधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पहाटे परिस्थितीची पाहणी केली.
काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मात्र, त्यावेळी अतिवृष्टीने हुलकावणी दिली होती. त्यानंतर बुधवारी शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळनंतर रात्रीपर्यंत पावसाचा जोर कायम राहिला होता. त्यामुळे वाशिष्ठी आणि शिवनदीतील पाण्याची पातळी वाढली होती. दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्याने रात्री तीनच्या सुमारास नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढत होते. रात्री तीनच्या सुमारास वाशिष्ठी नदीची पातळी ५.३० मीटर इतकी होती. पावसाचा जोर कायम राहिल्याने शहरात पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे हे रात्री तीनच्या सुमारास बहादूरशेखला वाशिष्ठी नदीकाठी पोहोचले. तिथे पाण्याची पातळी पाहिल्यानंतर ते बाजारपुलाकडे आले. त्यावेळी पाणी भरण्यास सुरुवात झाली होती. बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्यामुळे पुलाचे दोन्ही मार्ग बंद झाले होते. नदी पातळीत वाढ झाल्याने गणेश विसर्जन घाटाशेजारील ६ कुटुंबांना रात्रीच शेजारच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले. पुराच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा आपत्कालिन कक्षही सज्ज झाला होता.
दरम्यान, पहाटेच्या सुमारास चिंचनाका, वडनाका, लोटिस्मा वाचनालय, अनंत आईस फॅक्टरी, मुरादपूर, शंकरवाडी, भेंडीनाका, पेठमाप येथे पुराचे पाणी भरले होते. सुमारे दीड तास पुराचे पाणी शहरात भरले होते. त्यानंतर पूर ओसरण्यास सुरुवात झाली. दरम्यान, मुसळधार पावसात तालुक्यातील आकले - तिवरे मार्गावर दरड कोसळली. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही दरड जेसीबीच्या सहाय्याने दूर केल्याने वाहतूक पूर्ववत झाली. तसेच टेरव येथील लिंगेश्वर मंदिराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. गेल्या चोवीस तासात तालुक्यात १९७.११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर तालुक्यात एकूण पाऊस हा ६९४.२५ मिलिमीटर इतका झाला आहे.