खेडमध्ये ‘ब्रेक द चेन’ला नागरिकांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:32 AM2021-04-16T04:32:25+5:302021-04-16T04:32:25+5:30
खेड : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेला खेडमध्ये नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. शहरात अत्यावश्यक ...
खेड : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेला खेडमध्ये नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. शहरात अत्यावश्यक सेवा सोशल डिस्टन्सचे पालन करून सुरू असल्या तरी जमावबंदी व संचारबंदीचे नागरिक काटेकोर पालन करीत हाेते.
कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढत असून, बुधवारी (दि. १४) एका दिवसांत ३५ रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात दोनशेपेक्षा जास्त ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. आत्तापर्यंत साठपेक्षा जास्त व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. खेडच्या ग्रामीण भागात लोकांनी विनाकारण बाहेर पडणे बंद केले असून, शहरातही व्यापाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवली आहेत. पोलीस व प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’ मोहीम यशस्वी बनवण्यासारखी नियोजन केले आहे. तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालय, लवेल येथील शासकीय कोविड केअर सेंटर व अन्य खासगी कोविड केअर सेंटर आणखी सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; तर विनाकारण कोणी बाहेर फिरत असेल तर त्यांची कोरोना चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
खेड बसस्थानक परिसर सतत गजबजलेला असल्याने त्या ठिकाणी वावरणारे राज्य परिवहनचे चालक व वाहक तसेच रिक्षाचालक यांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये चार राज्य परिवहन कर्मचारी व ११ रिक्षाचालक यांना उपचारासाठी दाखल केले आहे. जे रिक्षाचालक कोरोना निगेटिव्ह आहेत त्यांना सोशल डिस्टन्स ठेवून दोन प्रवासी वाहून नेण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. संचारबंदीचे उल्लंनघन कोणी करू नये म्हणून पोलिसांनी भरणेंनाका, महाडनाका, शिवाजी चौक, बसस्थानक, गांधी चौक, तीनबत्ती नाका, दापोली नाका, आदी ठिकाणी कर्मचारी तैनात केले आहेत.
खेड तालुका हा रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट ते परशुराम घाटात महामार्गावर अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी शासनाला सहकार्य करून संचारबंदीचे पालन करावे व कोरोना साथ पसरण्यापासून रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
...........
khed-photo151 / khed-photo152 खेड शहरातील विविध भागांत गुरुवारी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (छाया : हर्षल शिराेडकर)