रत्नागिरी : राज्यात सत्ता समीकरणे बदलून महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीची समीकरणेही बदलली आहेत. विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनावगळता अन्य पक्षांनी स्थापन केलेल्या शहर विकास आघाडीमध्ये आता उभी फूट पडली आहे.
राष्ट्रीय कॉँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर विकास आघाडीतून बाहेर पडली आहे. तर स्वाभिमान पक्षाचे भाजपमध्ये विलिनीकरण झाले आहे. आघाडीत मोठी फूट पडल्याने शिवसेनेचा विजयाचा मार्ग सोपा झाल्याची चर्चा आहे.रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक २०१६च्या अखेरीस झाली होती. त्यानंतर शिवसेनेचे थेट नगराध्यक्ष म्हणून राहुल पंडित निवडून आले होते. पक्षांतर्गत ठरल्यानुसार त्यांनी आपल्या पदाचा दोन वर्षांच्या कालावधीनंतर राजीनामा दिला. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
रिक्त पदावर शिवसेनेचे बंड्या साळवी हे सध्या प्रभारी नगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आता थेट नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक २९ डिसेंबर २०१९ रोजी होणार आहे, तर मतमोजणी व निकाल ३० डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या हालचालींना जोर आला आहे.दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी कॉँग्रेस, बसपा व अन्य पक्षांतर्फे रत्नागिरीत पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी शहर विकास आघाडी कायम असून, मिलिंद कीर हेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये यांनी केली होती. मात्र, त्यानंतर कॉँग्रेसने या आघाडीत काँग्रेस नसल्याने जाहीर केले आहे. थेट नगराध्यक्ष निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यावयाचा याबाबत कोणताही निर्णय कॉँग्रेसने घेतलेला नाही, असे जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी स्पष्ट केले आहे.तसेच नगराध्यक्ष निवडणूक व अन्य विषयांबाबत निर्णय घेण्यासाठी सोमवारी सकाळी कॉँग्रेस भुवन, रत्नागिरी येथे शहर व तालुका कॉँग्रेसची बैठक बोलविण्यात आली आहे. कॉँग्रेस, मनसे व स्वाभिमान पक्ष शहर विकास आघाडीतून बाहेर पडल्याने आघाडी कमकुवत झाली आहे. राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या समीकरणामुळे रत्नागिरीतही नगराध्यक्ष निवडणूक महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून लढविली जाणार का, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.शिवसेनेसाठी पेपर सोपा?रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्षपद निवडणुकीत शिवसेना व शहर विकास आघाडी असा सामना रंगण्याची आधी शक्यता होती. मात्र, आघाडीत फूट पडल्याने आता शिवसेनेबरोबरच भाजप तसेच कॉँग्रेस, मनसे यांचे उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे.