रत्नागिरीच्या हवामानाचाही अभ्यास, देशातील सहा शहरांमध्ये समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 05:24 PM2020-12-02T17:24:29+5:302020-12-02T17:25:44+5:30
Temperature, ratnagirinews जागतिक बँक आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या महत्त्वाच्या जलविज्ञान हवामान कृती योजनेत देशातील ६ शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये रत्नागिरी शहराचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता रत्नागिरीत हवामानाचा अभ्यास होणार आहे.
रत्नागिरी : जागतिक बँक आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या महत्त्वाच्या जलविज्ञान हवामान कृती योजनेत देशातील ६ शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये रत्नागिरी शहराचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता रत्नागिरीत हवामानाचा अभ्यास होणार आहे.
राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील हर्णै, दाभोळ येथे चक्रीवादळ निवाराशेड उभारण्याचे काम सुरु आहे. रत्नागिरी शहरासह ६ ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये चक्रीवादळापासून कमी नुकसान व्हावे यासाठी भुयारी वीजवाहिन्या टाकण्याचे कामही वेगाने सुरु झाले आहे. तर पावसाळयात वीज पडून माणसे मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे.
या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील ९५२ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा बसविण्याचा ७ कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. भूकंप आपत्ती धोके अहवालात देशातील ५० निवडक शहरांमध्ये रत्नागिरीचा समावेश असून, त्यादृष्टीने कामे सुरु झाली आहेत.
या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरे अधिक सक्षम करण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी आवश्यक कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत यावर तज्ज्ञ अभ्यास करणार असून, हा अहवाल जागतिक बँकेकडे पाठविण्यात येणार आहे. एकूण १८ महिन्यांमध्ये हा अहवाल तयार करण्यात येणार असून, याची पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
यावेळी हायड्रोलॉजिस्ट सुजाना धर आणि शहर समन्वयक हर्षद धांडे यांच्यासह जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील एकमेव
या योजनेत देशातील ६ राज्यातील ६ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये गुजरातचे पोरबंदर, गोव्याचे पणजी, कर्नाटकचे मंगळुरु, केरळचे कोची, पश्चिम बंगालचे बिदानगर आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी या शहरांचा समावेश आहे.
याचा होणार अभ्यास
या योजनेत निवडलेल्या शहरांवर भविष्यात वाढती चक्रीवादळे, वाढते तापमान, बदलते ऋतुमान याचा शहर वाढ आणि विकासावर कोणता बदल होतो, यातून शहराला कोणते धोके आहेत, संकटे आल्यावर रहिवाशांना कोणता धोका तत्काळ पोहोचेल, कोणत्या प्रकारच्या सेवा इथे आहेत आणि कोणता समाज इथे राहतो, याचा अभ्यास या प्रकल्पातून केला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या वादळांना तोड देणे शक्य होणार आहे.