खेड : तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा वाढू लागली आहे. सद्यस्थितीत खेड तालुक्यात ५६ कोरोना पॉझिटिव्ह ॲक्टिव्ह रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. मार्च महिन्यात २२ पर्यंत ८९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यावर्षी जानेवारी महिन्यात एकूण ३५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते, तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला.
फेब्रुवारी महिन्यात १०४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, तर ३ रुग्ण मृत्युमुखी पडले. तसेच २२ मार्चपर्यंत एकूण ८९ रुग्ण आढळले असून, ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गतवर्षी २२ मार्चपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लाॅकडाऊन करण्यात आले होते, तर जिल्ह्यातील पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू एप्रिल महिन्यात खेड तालुक्यात झाला होता. गेल्या वर्षभरात तालुक्यात एकूण १६६६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, यापैकी १५२९ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर ८० जणांना प्राण गमवावा लागला आहे.
तालुक्यातील वरवली येथे फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. या संसर्गाचे कारण तेथील एक सार्वजनिक उत्सव ठरला होता. या महिन्यात पुन्हा एकदा असाच प्रकार कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या तळघर येथे घडला आहे. या गावातील एका वाडीत कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांपैकी तब्बल १७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, तर या वाडीतून घेतलेल्या स्वॅबपैकी २७ जणांचा अहवाल येणे बाकी आहे. एकीकडे तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी, जनतेमध्ये गांभीर्य नसल्याचे या प्रकारातून समोर येत आहे. सार्वजनिक व कौटुंबिक सोहळ्यात शासकीय मर्यादा असली तरी, अशा कार्यक्रमात सर्रासपणे ही मर्यादा ओलांडली जात असल्याचे वरवली व तळघर येथे झालेल्या सामूहिक संसर्गातून पुढे आले आहे.
चाैकट
तालुक्यातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लोटे आरोग्य केंद्रात सर्वात जास्त ३४९ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ आंबवली आरोग्य केंद्रांतर्गत ३४४ रुग्ण आढळून आले आहेत. सद्यस्थितीत ५६ रुग्ण उपचार घेत असून, यामध्ये खेड शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये ४, कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात १५, होम आयसोलेशनमध्ये ३०, दापोली येथील खासगी रुग्णालयात ३, रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात ३, तर कऱ्हाड येथे १ रुग्ण उपचार घेत आहे.