लांजा : कामाची कमी अंदाजपत्रक रकमेची निविदा भरली असतानाही संबंधित ठेकेदाराला कामाचा ठेका न देता मर्जीतील एका ठेकेदाराला कामाचा ठेका देऊन ग्रामपंचायतीचे नुकसान करू पाहणाऱ्या ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे लांजा तालुका मागासवर्गीय सेल अध्यक्ष दाजी गडहिरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आशा सेविकांच्या मागण्या तातडीने मान्य करा
चिपळूण : कोरोना विरुद्धच्या लढाईत आघाडीवर असणाऱ्या आशा सेविकांच्या मानधन, सुरक्षा व विमा कवचाबाबतच्या मागण्या राज्य सरकारने तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा नीलम गोंधळी यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे.
पिलर उभारण्याचे काम सुरू
चिपळूण : मुंबई-गाेवा महामार्गावर बहाद्दूरशेख ते शिवाजीनगर चिपळूण दरम्यान उड्डाण पूल उभारण्यात येत आहे. या पुलाचे काम आता सुरू झाले असून, खांब उभे करण्यासाठी खड्डे मारण्याचे काम वेगात आहे. येथे काँक्रीटचे खांब उभारले जाणार आहेत. सध्या हे काम रावतळे विंध्यवासिनी रस्त्यापर्यंत आले आहे.
दापोली तालुक्यात आढळले १०१ कोरोना रुग्ण
दापोली : तालुक्यात एकाच दिवशी तब्बल १०१ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेता यापुढे आता सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. नाही तर नाइलाजास्तव प्रशासनाला पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल. त्यामळे सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
आरपीआयचे निवेदन
खेड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, खेड तालुक्याच्या वतीने तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना तालुकाध्यक्ष विकास धुत्रे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मागासवर्गीय लोकांचे पदोन्नती आरक्षण तत्काळ देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
रस्त्याच्या निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी
देवरुख : देवरुख-पांगरी रस्त्याच्या निकृष्ट कामाची खातेनिहाय चौकशी करा, अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचाचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष मनोहर गुरव यांनी जिल्हाधिकाऱी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात केलेले रस्त्याचे डांबरीकरण पूर्णत: उखडल्याने कामाच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
२०० लोकांनी घेतली लस
चिपळूण : शहरातून परदेशात नोकरी व शिक्षणानिमित्त जाणाऱ्या नागरिक व विद्यार्थ्यांसाठी येथील नगरपरिषद, आरोग्य विभाग यांच्यामार्फत विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेला शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी सुमारे २०० जणांनी कोविशिल्डची लस घेतली.
शाळांचा घोळ कायम राहणार
रत्नागिरी : राज्य शासनाने जाहीर केलेले निकष बदलेपर्यंत दाखल्यांची सक्ती रद्द होईपर्यंत सुगम-दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांच्या यादीचा घोळ कायम राहणार असल्याची भूमिका शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर यांनी स्पष्ट केली आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत यावर जोरदार चर्चा करण्यात आली.
गावांना जोडणाऱ्या पुलावर खड्डे
खेड : तालुक्यातील काडवली-निरबाड या गावांना जोडणाऱ्या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. या पुलावरील काँक्रीट निघून गेल्याने खड्डे पडले असल्याने खड्ड्यामध्ये पाणी साचले आहे.