संपूर्ण आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करणार, कुणीही वंचित राहणार नाही; रत्नागिरी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 02:03 PM2021-05-21T14:03:41+5:302021-05-21T14:06:37+5:30

जिल्ह्यात या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत आढावा घेतला. यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

A comprehensive review will help the victims, no one will be deprived; Testimony of Chief Minister during his visit to Ratnagiri | संपूर्ण आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करणार, कुणीही वंचित राहणार नाही; रत्नागिरी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

संपूर्ण आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करणार, कुणीही वंचित राहणार नाही; रत्नागिरी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

googlenewsNext

रत्नागिरी- तौक्ते चक्रीवादळाने नेमके किती नुकसान झाले याबाबतचे पंचनामे पूर्ण होवू द्या, संपूर्ण आढावा घेऊन व्यवस्थित मदत केली जाईल, कुणीही वंचित राहणार नाही, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज रत्नागिरी येथे केले.

जिल्ह्यात या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत आढावा घेतला. यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यातील 5 तालुक्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात अधिक नुकसान  राजापूर व रत्नागिरी तालुक्यात आहे. वादळाचा फटका बसलेल्या सिंधुदूर्ग व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांचा पहाणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एक दिवसाच्या दौऱ्यावर होते. याची सुरुवात रत्नागिरी येथील बैठकीने झाली.

Tauktae Cyclone: "ते आले अन् निघून आले; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो"

जिल्ह्यात चक्रीवादळाने आंबा आणि काजू तसेच नारळाच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर  पंचनामा योग्य पध्दतीने करुन नेमेकेपणाने आकडेवारी सह प्रस्ताव सादर करा, असे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी या बैठकीनंतर अधिकाऱ्यांशी बोलताना दिले.

कोरोनाचा आढावा -
 जिल्ह्यातील कोव्हीड परिस्थितीचाही आढावाही याच बैठकीत घेण्यात आला. रुग्णांना चांगली उपचार सुविधा आपण देत आहोत. सोबतच रुग्णसंख्या प्रामुख्याने मृत्यूचे प्रमाण कमी होईल या दृष्टिकोनातून  सर्वांनी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले. दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येईल, असे म्हटले जात असले तरी योग्य ती खबरदारी आणि उपाय योजल्याने आपण ती येणारच नाही यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले. जिल्ह्यात सुरु असणारे लसीकरण आणि त्याबाबतीत इतर माहिती यावेळी सादर करण्यात आली.

मोठ्या प्रमाणावर नुकसान -
जिल्ह्यात झालेल्या नुकसनीबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यावेळी सादरीकरण केले. या चक्रीवादळात जिल्ह्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत. मृत पशुधनाची संख्या 11 आहे.

'पॅकेज'वर माझा विश्वास नाही, पण मदतीशिवाय कुणी राहणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

जिल्ह्यात 17 घरे पूर्णत: बाधित झाली असून अंशत: बाधित घरांची संख्या 6766 आहे. यात सर्वाधित दापोलीत 2235 आहेत. रत्नागिरी तालुक्यात 1084 तर राजपूरातील  891 घरांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या गोठ्यांची जिल्ह्यातील संख्या 370 इतकी आहे. वादळात वाऱ्यामुळे 1042 झाडे पडली. यात सर्वाधित 792 झाडे राजापूर तालुक्यात पडली. रत्नागिरीत ही संख्या 250 इतकी आहे. चक्रीवादळात 59 दुकाने व टपऱ्यांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या शाळांची संख्या 56  आहे. या सर्व शाळा राजापूर येथील आहेत.

फळबागांचे मोठे नुकसान -
चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणावर फळबागांचे नुकसान झाले. अंदाजे 1100 शेतकऱ्यांचे या साधारण 2500 हेक्टर इतके नुकसान झाले. यातील 3430 शेतकऱ्यांच्या 810.30 हेक्टरवरील पंचनाम्यांचे काम आजपर्यंत पूर्ण झाले आहे. चक्रीवादळाचा सर्वाधित फटका विद्युत वितरण कंपनीला बसला. या वादळात 1239 गावातील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. आतापर्यंत 1179 गावांचा पुरवठा पूर्ववत झाला आहे.

Tauktae Cyclone: “मुख्यमंत्री केवळ बाता मारतायत, इतर जिल्ह्यांमध्ये का जात नाहीत”: देवेंद्र फडणवीस

बाधित उपकेंद्राची संख्या 55 व फिडरची संख्या 206 आहे. याची दुरुस्ती देखील आता पूर्ण झाली आहे. वीज खांबाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उच्चदाब वाहिनीचे 485 खांब बाधित झाले असून यापैकी 125 पूर्ववत करण्यात आले. गावागावात पडलेल्या वीज खांबाची संख्या 1233 इतकी आहे. यातील 133 खांबांची उभारणी आतापर्यंत पूर्ण झाली आहे.

मत्स्य व्यवसाय -
जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर आश्रयास आलेल्या बोटींपैकी 3 बोटी पूर्णत: तर 65 बोटींचे अशंत: नुकसान झाले. 71 जाळ्यांचेही नुकसान झालेले आहे. अंदाजित नुकसान 90 लाख रुपयांपर्यंत आहे. या चक्रीवादळात जिल्हा परिषदेच्या 301 मालमत्ता बाधित झालेल्या आहे. अंदाजे 1 कोटी 98 लाख 84 हजार पेक्षा अधिक नुकसान आहे.

ई-उद्घाटन - 
जिल्हा पोलिसांतर्फे सुसज्ज असे कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. याचे ई-उद्घाटन याप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी केंद्राबाबत योवळी माहिती दिली तसेच  त्यावरील एक लघुपट यावेळी दाखवण्यात आला.

CM Uddhav Thackeray on Lockdown : महाराष्ट्रात 1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार का?, मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट उत्तर

साधेपणाने बैठक -
बैठकीसाठी व्यासपीठ उभारले असले तरी तेथे न जात मुख्यमंत्री महोदयांनी व्यासपीठा समोरील 'डी'मध्ये खुर्च्या लावण्यास सांगितले व साधेपणाने सादरीकरण व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. स्वागतासाठी हार - बुकेदेखील नको, अशा सूचना दिलेल्या असल्याने साध्या पध्दतीनेचे पूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, माजी आमदार  हुस्नबानु खलिफे, जि.प. माजी अध्यक्ष रोहन बने, नगराध्यक्ष बंडया साळवी, मुख्य सचिव सीताराम कुंटे, विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, जिल्हा परिषद अध्यक्षा इन्दुराणी जाखड, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड आदि मान्यंवर उपस्थित होते.
 

Web Title: A comprehensive review will help the victims, no one will be deprived; Testimony of Chief Minister during his visit to Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.