लोटे गावात कोरोना वाढीने चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:24 AM2021-05-28T04:24:07+5:302021-05-28T04:24:07+5:30
आवाशी : खेड तालुक्यातील लोटे गावात कोरोनाबाधितांच्या व मृत्यूंच्या वाढत्या संख्येने चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाने वेळीच दक्षता घेऊन ...
आवाशी : खेड तालुक्यातील लोटे गावात कोरोनाबाधितांच्या व मृत्यूंच्या वाढत्या संख्येने चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाने वेळीच दक्षता घेऊन काेरोनाचा वाढता प्रसार रोखावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.
खेड तालुक्याचा मागील काही दिवसांचा अहवाल पाहता, कोरोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट होत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे. मात्र, तालुक्यातील औद्योगिक वसाहत असणाऱ्या लोटे गावात रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील माळवाडी वसाहतीत अनेकजण कोरोनाबाधित असल्याची माहिती तेथील स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात येत आहे. रुग्ण उपचाराधिन नसले तरी अनेकांना कोरोनासदृश्य लक्षणे असून, त्यांच्यावर खासगी डाॅक्टरांकडून घरीच उपचार सुरु आहेत.
मागील दीड महिन्यात याच वसाहतीत पाचजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, असे येथील रहिवासी सांगतात. औद्योगिक वसाहतीमुळे स्थानिकांसह याठिकाणी बाहेरील तालुका, जिल्हा, राज्य, परप्रांतीय रहिवाशांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे दाट लोकवस्तीचा भाग म्हणूनही लोटेकडे पाहिले जात आहे. याच भागात दारुचे गुत्ते अधिक असून, तेथे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाने माळवाडीतून बाहेर येणाऱ्यांना वा या वाडीत प्रवेश करणाऱ्यांना वाडीच्या मुख्य प्रवेशद्वारावर अटकाव करावा किंबहुना हा परिसर कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.