रत्नागिरी : बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरी बुवांचा शिमगोत्सव रविवारपासून सुरू होता. मध्यरात्री १२ वाजता पालखी भैरी मंदिरात स्थानापन्न झाल्यानंतर धूपारती व गावाचे गाऱ्हाणे घालण्यात आल्यानंतर शिमगा उत्सवाची सांगता झाली.शुक्रवारी श्री देव भैरीची पालखी रंग खेळण्यासाठी दुपारी झाडगांव सहाणेवरून उठली. त्यानंतर शहरात सर्वत्र रंगपंचमीला प्रारंभ झाला. पोलीस कर्मचाऱ्यांनी शस्त्रसलामी दिल्यानंतर पालखी श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून झाडगांव नाक्यावरून गाडीतळ येथे आली.
पुढे श्री नवलाई पावणाई मंदिरातून शहर पोलीस स्थानक, तेथून धनजीनाका, राधाकृष्ण नाका, रामनाका, मारुती आळी, गोखलेनाका, ढमालनीचा पार, विठ्ठल मंदिर, काँग्रेस भुवन, मुरलीधर मंदिर खालची आळीमार्गे मध्यरात्री १२ वाजता पालखी भैरी मंदिरात स्थानापन्न झाली. त्यानंतर मंदिरात धूपारती व गावाचे गाऱ्हाणे घालण्यात आले. शिवाय कोरोनाचा समूळ नाश करून समस्त जनतेच्या रक्षणाचे साकडे भैरीबुवांना घालण्यात आले.बारा वाड्यांचे ग्रामदैवत असणाऱ्या भैरी बुवाचा शिमगोत्सव शासकीय निर्बंधात साजरा करण्यात आला. गर्दी टाळून शांततेत व साधेपणाने गेले चा-पाच दिवस सुरू असलेल्या शिमगा उत्सवाची शुक्रवारी रात्री सांगता झाली. काही गावात पालख्या पाडव्यापर्यंत असल्याने शांततेत शिमगोत्सव साजरा केला जात आहे. गर्दी टाळण्यासाठी पालखी भेट सोहळा, यात्रा व अन्य कार्यक्रम रद्द करण्यात आले असून मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम करण्यात येत आहेत.