भाजपच्या सत्ताकाळात देशातील महिलांचा अवमान, रोहिणी खडसे यांचा आरोप
By संदीप बांद्रे | Published: January 22, 2024 06:13 PM2024-01-22T18:13:01+5:302024-01-22T18:13:52+5:30
रामलला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचादेखील समावेश केला नाही
चिपळूण : केंद्रात व राज्यात असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात भ्रष्टाचार, जुमला आणि देशातील महिलांचा अवमान होत आहे. महिलांची असुरक्षितता वाढली आहे. आज रामलला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचादेखील समावेश केला नाही. यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही, अशा भावना शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी चिपळूण येथील जिल्हा महिला आढावा बैठकीत व्यक्त केल्या.
चिपळुणातील माटे सभागृहात राष्ट्रवादीचा (शरद पवार गट) जिल्हास्तरीय महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध पदावरील नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. व्यासपीठावर प्रांतिक प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रमेश कदम, विभागीय अध्यक्षा भावना घाणेकर, जिल्हा निरीक्षक बबन कनवाजे, प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेटे, प्रदेश सरचिटणीस बशीर मुर्तुझा, माजी महिला जिल्हाध्यक्षा नलिनी भुवड, प्रदेश उपाध्यक्षा सुजाता तांबे, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश शिगवण, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रईस अलवी, डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष दाभोळकर, महिला जिल्हाध्यक्षा दीपिका कोतवडेकर, उपजिल्हाध्यक्षा रुक्सार अलवी, चिपळूण तालुकाध्यक्षा राधा शिंदे, शहर अध्यक्षा डॉ. रेहमत जबले आदी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, देशात भाजपकडून रामाच्या नावावर राजकारण सुरू आहे. हिंदू, मुस्लीम धर्मात तेढ निर्माण करून त्याचा राजकीय फायदा घेण्याचे काम सत्ताधारी भाजपकडून केले जात आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून (१९९९) पक्ष अनेक कठीण प्रसंग व अडचणींतून वाटचाल करीत आहे. पक्ष स्थापन झाल्यावर काही महिन्यातच निवडणुका लागल्या. त्यात पक्षाने चांगले यश मिळविले. पक्ष स्थापनेपासून आजपर्यंत विविध वरिष्ठ पदे व मंत्रिपदे भोगली तीच लोकं आता ईडीच्या भीतीपोटी लाचार होऊन भाजपमध्ये गेली. अशांना या निवडणुकीत योग्य जागा दाखवा.
रोहिणी खडसे म्हणाल्या, हा देश व राज्य माता जिजाऊ, अहिल्या होळकर, राणी लक्ष्मीबाई अशा पराक्रमी व सुसंस्कृत महिलांचा वारसा सांगणारा आहे. त्यांनी घडविलेल्या पिढीचा वारसा पुढे चालू आहे. अशा या पराक्रमी महिलांच्या देशात व राज्यात आज भ्रष्टाचार जुमला पार्टीकडून महिलांचा अवमान होत आहे. महिला असुरक्षित आहेत. देशभरात राम मंदिर कार्यक्रमाचा जल्लोष सुरू असताना त्यामध्ये एकाही महिलेचा सहभाग दिसून आला नाही. यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही.
पक्षाचे नेते पवार आज पडत्या काळात पक्षासाठी झटून काम करीत आहेत ते केवळ देशाची लोकशाही सुरक्षित राहावी, महिलांचा सन्मान व्हावा, बेरोजगारी कमी व्हावी याच हेतूने. आज महिला विविध अडचणी व समस्यांना तोंड देत आहेत. सीतामातेचा वनवास चौदा वर्षानंतरही संपला नव्हता. तिला अग्नीदिव्य करावे लागले होते. तीच परिस्थिती आता देशातील महिलांची आहे. आज महिला विविध समस्या व अडचणींचे अग्नीदिव्य सहन करीत आहेत. त्यांचा वनवास संपत नाही. हे सर्व थांबवायचे असेल तर येत्या निवडणुकीत महिलांनी आपली ताकद सत्ताधारी पक्षाला दाखवून द्यावी, असे आवाहन केले. यावेळी सखी थरवळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, तर राधा शिंदे यांनी आभार मानले.