कोरोनामुळे मच्छिमारांची जाळी फाटलेलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:32 AM2021-04-20T04:32:24+5:302021-04-20T04:32:24+5:30
रत्नागिरी : एकीकडे वातावरणाचे दुष्टचक्र, तर दुसरीकडे काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यातच मच्छिमारांसाठी जिल्ह्यात ...
रत्नागिरी : एकीकडे वातावरणाचे दुष्टचक्र, तर दुसरीकडे काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यातच मच्छिमारांसाठी जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा डिझेल परतावा न मिळाल्याने मच्छिमार दुहेरी कोंडीत सापडले आहेत. काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी ॲन्टिजेन चाचणी करण्यावर भर देण्यात आला आहे. मिरकरवाडा येथे खलाशांची आराेग्य विभागातर्फे चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तीनजण पाॅझिटिव्ह आढळले. त्याचाही धसका मच्छिमारांनी घेतला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारी व्यवसाय अडचणीत आला आहे. जिल्ह्यात मिरकरवाडा, राजीवडा, जयगड, साखरीनाटे, दाभोळ, हर्णै ही मासेमारीसाठी प्रसिध्द बंदरे आहेत. चालू मोसमामध्ये अवकाळी पाऊस, वादळे अशा संकटांमुळे शासनाच्या आदेशानुसार अनेकदा मासेमारी बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे व्यावसायिकांचे काेट्यवधींचे नुकसान झाले. सातत्याने भरपाईची मागणी करण्यात येत असतानाच सध्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र सावधानता बाळगली जात आहे. त्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. नियमांचे पालन करून मासेमारी सुरू असतानाच मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांकडून मासेमारी बंद करण्याची सूचना देण्यात आली. मासेमारीसाठी नौका समुद्रात गेल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद मत्स्य खात्याकडून मच्छिमारांना देण्यात आल्याने मच्छिमारही घाबरले आहेत.
आधीच मासेमारी व्यवसाय तोट्यात चाललेला असताना, सध्या मासेमारी नौका किनाऱ्यालाच नांगरावर उभ्या करण्यात आल्याने खलाशांचे पगार, भत्ता, डिझेल, जाळ्यांचा खर्च, तसेच कर्जाचे थकलेले हप्ते कसे भरायचे, असा प्रश्न मच्छिमारांना सतावत आहे. त्यामुळे शासनाने वेळीच लक्ष घालून मच्छिमारांनाही मदत द्यावी, अशी मागणी मच्छिमारांकडून करण्यात येत आहे.
...........................
खलाशी परतले
पुन्हा कडक लाॅकडाऊन हाेण्याच्या भीतीने परजिल्ह्यातून आलेले खलाशी आपल्या गावी परतत आहेत. त्यामुळे नाैकांवर खलाशांचा तुटवडा जाणवत आहे. खलाशांअभावी अनेक नाैका बंदरातच उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत.
...................................
मासेमारी नौका, खलाशी, मासे विक्री करणाऱ्या महिला या सर्वांचा उपजीविकेचा विचार करण्यात येऊन शासनाने आम्हा मच्छिमारांना आर्थिक मदतीचा हातभार लावावा.
- शब्बीर वस्ता, मच्छिमार नेते
मिरकरवाडा, रत्नागिरी.