लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारनंतर अधिकारी आणि कर्मचारी अशा १३९जणांची स्वॅब चाचणी घेण्यात आली. मंगळवारी याचा अहवाल प्राप्त झाला असून, या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
जिल्हा परिषदेत काही दिवसांपूर्वीच एका विभागातील दोन कर्मचारी पाॅझिटिव्ह आले आहेत, तसेच सध्या शिमगोत्सवात कोरोनाचा हाॅटस्पाॅट असलेल्या मुंबईहून चाकरमानी गावाला दाखल झाले आहेत. अजूनही काही जण येत आहेत. त्यामुळे या कालावधीत कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दोन तीन दिवसांपासून कोरोनाची संख्या ५५ पर्यंत गेली आहे. त्यामुळे शिमगोत्सवाच्या कालावधीत रुग्ण वाढतायत की काय, ही भीती निर्माण झाली आहे. त्यातच जिल्हा परिषदेत दोन रुग्ण सापडल्याने भीती अधिक वाढली आहे.
जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक नागरिक विविध कामांसाठी येत असतात. त्यामुळेही कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका आहेच. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचा आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारनंतर कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी या कार्यालयातील विभागप्रमुख आणि विविध विभागातील कर्मचारी अशा १३९ जणांची स्वॅब चाचणी घेण्यात आली. जिल्हा शासकीय रक्तपेढीचे जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. अर्जुन सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. मंगळवारी त्याचा अहवाल मिळाला असून, सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे या सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांना हायसे वाटले आहे.