corona virus : दापोलीत अँटिजेन टेस्टला आरोग्य केंद्रांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 02:21 PM2020-10-05T14:21:24+5:302020-10-05T14:26:05+5:30
corona virus, Health centers, antigen test, ratnagirinews कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दापोली तालुक्यातील तब्बल ७ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी या टेस्टला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे शासनाकडून आलेले हजारो कीट प्राथमिक आरोग्य केंद्रात धूळखात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शिवाजी गोरे
दापोली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दापोली तालुक्यातील तब्बल ७ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी या टेस्टला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे शासनाकडून आलेले हजारो कीट प्राथमिक आरोग्य केंद्रात धूळखात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दापोली तालुक्यातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी केवळ एकाच आरोग्य केंद्रात अँटिजेन टेस्ट केली जात आहे. उर्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी या टेस्टला विरोध दर्शवला आहे. तालुक्यातील उंबर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अँटिजेन टेस्ट केली जात आहे.
तालुक्यातील पिसई, साखळोली, फणसू, दाभोळ, आसूद - आंबवली, आंजर्ले, केळशी या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये येणाऱ्या रुग्णांची अँटिजेन टेस्ट करण्याला कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे रुग्णांना टेस्ट करण्यासाठी दापोलीत यावे लागत आहे.
तालुक्यातील ७ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी टेक्निशियनच्या माध्यमातून या टेस्ट व्हाव्यात, ते आमचे काम नाही, असे कारण दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या कर्मचाऱ्यांना अँटिजेन टेस्ट कशी घ्यायची, यासंदर्भात यापूर्वीच प्रशिक्षण देण्यात आले आहे. अँटिजेन टेस्ट घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसे कर्मचारीही उपलब्ध असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
याआधी शासनाकडून अँटिजेन कीट उपलब्ध होत नसल्याची ओरड केली जात होती. आता शासनाकडून कीट उपलब्ध करण्यात आली असून, तपासणीच होत नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरवण्यात आलेले सुमारे हजारो कीट धूळखात पडून आहेत.
याकडे आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. तालुक्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी अँटिजेन टेस्ट करण्याच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. यावर वरिष्ठ अधिकारी कोणता तोडगा काढतात, हेच पाहायचे आहे.
''दापोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी कोविडच्या कामामध्ये हलगर्जीपणा करत असतील तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी. तसेच सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटिजेन टेस्टच्या कीट उपलब्ध आहेत. परंतु आठपैकी सात प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी या टेस्ट करण्याला विरोध करत असल्याचे समोर येत आहे. या कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी आपण आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार आहोत.''
- योगेश कदम,
आमदार, दापोली