रत्नागिरी : केंद्राने विविध राज्यात जाण्याकरिता काही विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे मडगावकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस शनिवारी रत्नागिरी स्थानकात १०.४० मिनिटाने दाखल झाली. या गाडीला रत्नागिरी स्थानकावर तांत्रिक कारणाकरिता काही मिनिटांचा थांबा होता. त्यावेळी रत्नागिरी स्थानकात ३०० ते ४०० नागरिक उतरले त्यांची तपासणी करण्यात आली.केंद्राने विविध राज्यात जाण्याकरिता विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या मुंबईतून सुटल्यावर थेट नियोजितस्थळी पोहोचणार आहेत. मात्र, शनिवारी सकाळी राजधानी एक्स्प्रेस रत्नागिरी स्थानकात काही काळ थांबल्यावर प्रवाशांची गर्दी दिसली. मडगावकडे जाणारी ही गाडी काही तांत्रिक कारणासाठी रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली होती. मात्र, रत्नागिरीत प्रवाशांची गर्दी झाल्याने प्रवाशांनी नेमके कोणते तिकीट काढले होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे.रत्नागिरीत गाडी थांबताच प्रवाशांनी गाडीतून उतरण्यास सुरूवात केली. उतरलेल्या लोकांची रितसर अर्ज भरून माहिती व तपासणी करण्यात आली. या प्रवाशांनी मडगावपर्यंत तिकीट काढून रत्नागिरीत उतरले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जर मडगावपर्यंत तिकीट देण्यात आले तर प्रवासी रत्नागिरीत उतरले कसे, असा सवालही उपस्थित केला जात आहे. रविवारीदेखील एक गाडी नवी दिल्ली येथून मडगावला जाणार आहे. या गाडीला रत्नागिरी स्थानकात अधिकृत थांबा देण्यात आला आहे.