खेड : तालुक्यातील अलसुरे-बौद्धवाडी येथे
वीजपुरवठा खंडित केल्याच्या रागातून विद्युत
खांबावर चढून स्टंटबाजी करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अजय शरद मोहिते याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
घरातील वीजबिलापोटीचे देयक न भरल्याने
महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा खंडित
करण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. याचाच राग मनात धरून हा तरुण नजीकच्याच विद्युत खांबावर चढून शेवटचे टोक गाठताच तातडीने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. खांबावर चढलेला युवक आरडाओरडाही करत होता. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर सारे जमा झाले. याचदरम्यान अलसुरे येथे पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकिरण काशिद आले होते. विद्युत खांबावर चढून तरुण स्टंटबाजी करत असल्याचे समजल्यानंतर काशिद घटनास्थळी दाखल झाले. तरुणाची समजूत काढून विश्वासात घेत खांबावरून खाली उतरवले. त्यानंतर पोलिसात आणण्यात आले.