काेराेनाची भीती दूर सारून मंडणगडात खरेदीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:24 AM2021-06-02T04:24:12+5:302021-06-02T04:24:12+5:30
मंडणगड : महाराष्ट्रात सलग सुरू असलेल्या दीड महिन्याच्या लॉकडाऊननंतर अनलॉकची प्रक्रिया १ जूनपासून सुरू होण्याची अपेक्षा असताना पुन्हा लाॅकडाऊनची ...
मंडणगड : महाराष्ट्रात सलग सुरू असलेल्या दीड महिन्याच्या लॉकडाऊननंतर अनलॉकची प्रक्रिया १ जूनपासून सुरू होण्याची अपेक्षा असताना पुन्हा लाॅकडाऊनची घाेषणा करण्यात आल्याने नागरिकांनी मंगळवारी शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली हाेती़ शहरात जनसागर उसळलेला असतानाच दुचाकी, चारचाकी यांचे प्रमाण वाढल्याने बाहेरुन आलेल्या नागरिकांना बाजारपेठेतील रस्त्यावरून चालणेही अवघड बनले होते.
जिल्ह्यातील लॉकडाऊनचे स्वरूप काय असणार आहे, याचा आरखडा स्थानिक प्रशासनाकडे मंगळवारी दुपारीपर्यंत पोहोचलेला नव्हता़ या संदर्भात जिल्हाधिकारी व मंत्री यांच्यातील सभांचे सत्र न संपल्याने नवी नियम कोणते, त्यांची अंमलबजावणी कशी करायची, असे प्रश्न उपस्थित केले जात हाेते़ स्थानिक व्यापाऱ्यांची मंडणगड नगरपंचायतीत दोनदा सभा झाल्याने नवीन नियमांविषयी व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम हाेता़ लाॅकडाऊन हाेणार असा संदेश साेमवारी सायंकाळपासून साेशल मीडियावर फिरताच मंडणगडातील नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली हाेती़ खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियमही पायदळी तुडवले हाेते़ काेराेनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला़ मात्र, स्थानिक प्रशासन आणि पाेलीस प्रशासनाने ही गर्दी आटाेक्यात आणण्यासाठी काेणतीच उपाययाेजना केलेली नसल्याने गर्दी वाढतच हाेती़
---------------------
रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन हाेणार असल्याचे कळताच मंडणगडातील नागरिकांनी खरेदासाठी शहरात माेठ्या प्रमाणात गर्दी केली हाेती़ (छाया : प्रशांत सुर्वे)