क्रशरसाठी लावण्यात येणाऱ्या सुरुंगामुळे घरांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:31 AM2021-07-31T04:31:28+5:302021-07-31T04:31:28+5:30

देवरुख : संगमेश्‍वर तालुक्‍यातील मुरादपूर पातीची मधलीवाडी येथील डोंगरात क्रशरसाठी सुरुंग लावण्यात येत असल्यामुळे येथील घरांना धोका निर्माण झाला ...

Danger to houses due to mines laid for crushers | क्रशरसाठी लावण्यात येणाऱ्या सुरुंगामुळे घरांना धोका

क्रशरसाठी लावण्यात येणाऱ्या सुरुंगामुळे घरांना धोका

Next

देवरुख : संगमेश्‍वर तालुक्‍यातील मुरादपूर पातीची मधलीवाडी येथील डोंगरात क्रशरसाठी सुरुंग लावण्यात येत असल्यामुळे येथील घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे क्रशरला दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी, अशी मागणी मधलीवाडी व चाचेवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचे निवेदन संगमेश्वर तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले आहे. या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी दि. १५ ऑगस्ट रोजी ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या भूसुरुंगांमुळे घरांना तडे जात असल्याने सद्यपरिस्थितीत पुन्हा घर बांधणे किंवा दुरुस्त करण्याइतकी येथील शेतकऱ्यांची परिस्थिती नाही. क्रशरकरिता भूसुरुंग लावले जातात, त्या जागेलगत वाडीतील ग्रामस्थांच्या जागा आहेत. मात्र, शासन स्तरावर आम्हा लगतदारांची हरकत कोणीही विचारात घेत नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. आमच्या जमिनीत काजू व जनावरांचा चारा असून, पाचशे मीटरच्या आत काजू लागवड नाही, असा चुकीचा उल्लेख पंचयादीत केलेला आहे तसेच उलटाचा पऱ्या हा या क्रशर व भूसुरुंगाच्या ठिकाणी उगम पावत असल्याने या क्रशरजवळील माती, लहान-मोठी खडी पऱ्यात वाहून येते. त्यामुळे मासे मरतात, असेही निवेदनात म्हटले आहे.

भूसुरुंगामुळे येथील विहीर व बोअरवेलचे पाण्याचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मुरादपूर वरचीवाडीतील लोकांना या क्रशरचा धोका नाही. तेथील काही लोक पंचयादी, जबाबदार व लगत जमीन म्हणून नावे देतात तसेच सह्या करतात. परंतु, त्यांना कोणताही धोका नाही, अशा लोकांमुळे आम्हा कुटुंबांना मानसिक व आर्थिक त्रास होत आहे. हा क्रशर होण्यापूर्वी म्हणजे २०१५ सालात भूसुरुंग बंद करण्यासंदर्भात दोन्ही वाडीतील लोकांनी निवेदन दिले होते. या निवेदनानंतर काही काळ क्रशर बंद करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर ग्रामपंचायतीने २०१७ला ना हरकत दाखला दिला. त्यानंतर क्रशर व भूसुरुंग बंद करण्यासंदर्भात ग्रामसभेत १८ एप्रिल २०१८ रोजी ठराव संमत करण्यात आला व तालुक्‍याच्या आमसभेतदेखील क्रशर व भूसुरुंग बंद करण्यासंदर्भात ठराव करण्यात आला.

तसेच २०१८पासून पत्रव्यवहार करूनही २०२० साली अपर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या परवानगीमुळे एक क्रशर मालक व्यवसाय करत आहेत. भूसुरुंगाने भूस्खलन झाल्यास डोंगराच्या पायथ्याशी असणारी कुटुंब गाडली जातील, याला जबाबदार कोण असेल, असा प्रश्न उपस्थित केला आहे. येथील बावनदीला महापूर येतो, तेव्हा येथील काही घरांच्या जवळ पाणी येते. पूर्व-पश्चिम-दक्षिण या तिन्ही दिशेला पाणीच पाणी असते. उत्तरेला डोंगराळ भाग असल्याने भूसुरुंगाच्या हादऱ्याने डोंगराळ भागात भूस्खलन झाल्यास डोंगर व नदी यांच्यामध्ये मधलीवाडी व चाचेवाडीतील घरे असून, येथील डोंगर घरांवर येऊ शकतो. त्यामुळे जीवितहानी होऊ शकते, असे या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Danger to houses due to mines laid for crushers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.