महामार्गाची संरक्षक भिंत कोसळल्याने वाहतुकीला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:24 AM2021-06-04T04:24:51+5:302021-06-04T04:24:51+5:30
राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाच्या कामामध्ये तालुक्यातील कोंढेतड येथे रस्त्यालगत बांधण्यात आलेली संरक्षक भिंत या वर्षी पावसाळ्याचा प्रारंभ ...
राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाच्या कामामध्ये तालुक्यातील कोंढेतड येथे रस्त्यालगत बांधण्यात आलेली संरक्षक भिंत या वर्षी पावसाळ्याचा प्रारंभ होण्यापूर्वी सुमारे पाचशे फूट खोल दरीमध्ये कोसळली. त्यामुळे परिसरातून धावणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. राजापूर तालुक्यामध्ये सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत स्थानिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. मात्र, त्याकडे ठेकेदार कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कानाडोळा केला जात आहे.
शहरानजीकच्या कोंढेतड येथे वाहनांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत बांधली आहे. मात्र, पावसाळ्याचा शुभारंभ होण्यापूर्वीच ही भिंत लगतच्या दरीमध्ये कोसळली. कोसळलेल्या भिंतीमुळे त्या परिसरातून धावणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला आहे. निकृष्ट दर्जाबाबत नापसंती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, संरक्षक भिंत कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांनी सहकाऱ्यांसमवेत केली. या वेळी संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधून संरक्षक भिंतीच्या बांधकामाच्या निकृष्ट दर्जाबाबत तीव्र नापसंती व्यक्त करताना तातडीने नव्याने संरक्षक भिंत बांधण्याची सूचना केल्याचे लांजेकर यांनी सांगितले.
---------------------------
मुंबई-गाेवा महामार्गाच्या चाैपदरीकरणाच्या कामामध्ये राजापूर तालुक्यातील काेंढेतड येथील संरक्षक भिंत काेसळली आहे़