दापोली : वाडीची भांडी परत न दिल्याने गावातील ग्रामस्थाला बेदम मारहाण करण्यात येत होती. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेले उपसरपंच विनायक सोनू पाष्टे यांना महात्मा गांधी तंटामुक्त समितीची सभा रद्द केल्याच्या रागातून गावातील टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना दापोली तालुक्यातील शिरवली गावात रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.तालुक्यातील शिरवणे - भेकरेवाडी येथे रविवारी सायंकाळी ४ वाजता तंटामुक्त समितीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी काही मुंबईकरदेखील उपस्थित होते. सुटीच्या दिवशी ग्रामपंचायतीमध्ये तंटामुक्तीची बैठक घेण्याला उपसरपंच विनायक पाष्टे यांनी विरोध केला. त्यानंतर आजची सभा रद्द होऊन १९ डिसेंबरला ही बैठक पुन्हा लावण्याचे सर्वानुमते ठरले.सभा रद्द झाल्यानंतर सर्वजण संतोष कापले यांच्या घरी गेले. संतोष कापले यांनी ११ नोव्हेंबर रोजी वाडीची भांडी लग्नाकरिता नेली होती. मात्र, त्यांनी भांडी परत न केल्याने काही लोकांनी संतोष कापले यांना जाब विचारला. यावेळी जमलेल्या ग्रामस्थांमध्ये बाचाबाची होऊन काहीजणांनी कापले यांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली.
त्याचवेळी त्यांना मारू नका, असे म्हणत उपसरपंच विनायक पाष्टे मध्यस्थी करायला गेले. त्यावेळी सभा रद्द झाल्याचा राग मनात धरून काहीजणांनी पाष्टे यांनाच मारहाण केली. त्यांना वाचविण्यासाठी आलेल्या पत्नीलाही धक्काबुक्की करण्यात आली असल्याची फिर्याद विनायक पाष्टे यांनी पोलीस स्थानकात दिली आहे.