पणदेरी धरणातील जलाशयाच्या पाणी पातळीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:21 AM2021-07-11T04:21:44+5:302021-07-11T04:21:44+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क मंडणगड : गळतीमुळे धोकादायक बनलेल्या पणदेरी धरणाची पाणी पातळी कमी करण्यात प्रशासनाला यश आले आहे. कालव्यातील ...

Decrease in water level of reservoir in Panderi dam | पणदेरी धरणातील जलाशयाच्या पाणी पातळीत घट

पणदेरी धरणातील जलाशयाच्या पाणी पातळीत घट

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

मंडणगड : गळतीमुळे धोकादायक बनलेल्या पणदेरी धरणाची पाणी पातळी कमी करण्यात प्रशासनाला यश आले आहे. कालव्यातील पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवण्यात आला असून, भिंतीवरील पाण्याचा दाब कमी झाला आहे. यावर्षी पावसात धरणात पाणीसाठा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्य भिंतीला लागलेल्या गळतीमुळे पणदेरी धरण धोकादायक बनले. सतत दोन दिवस भिंतीतील गळती काढण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले. मात्र, धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणी थांबविण्यात अडचण निर्माण होत होती. धरणाच्या भिंतीवर पाण्याचा मोठा दाब असल्याने कोणतीही उपाययोजना तांत्रिक बाजूंची पडताळणी व निरीक्षण करून लघु पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना करावी लागत होती. त्यातच कालव्याच्या मुखाजवळ गळती लागल्याने कालव्यातून पाणी सोडणे खूपच धोक्याचे होते. यासाठी प्रथम धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर विसर्ग होणाऱ्या सांडव्याची भिंत फोडून उंची कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ब्लास्टिंग करून भिंत ५ बाय दीड मीटरने कमी करून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला.

गळती लागलेल्या ठिकाणी पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर तांत्रिक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने कालव्याचा दरवाजा हळूहळू उघडण्यात आला. त्यातूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने धरणातील पाणी पातळीत घट होऊ लागली. दरम्यान, दोन दिवस मातीचा भराव करून लागलेली गळती थांबविण्यात यशही आले. त्यामुळे धोका टळून मोठा अनर्थ टळला. दोन्ही बाजूंनी पाणी ओढ्यावाटे सावित्री खाडीकडे प्रवाहित करण्यात आले. पावसाने कृपादृष्टी केल्याने कामाला गती मिळाली. यावेळी आलेल्या आपत्तीला सामोरे जात लघुपाटबंधारे विभागाने प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Web Title: Decrease in water level of reservoir in Panderi dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.