रणरणत्या उन्हामुळे ‘नारिंगी’च्या पातळीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:31 AM2021-04-01T04:31:39+5:302021-04-01T04:31:39+5:30
खेड : दरवर्षी पावसाळ्यात ओसंडून वाहणाऱ्या आणि अनेकदा पुराचा फटका देणाऱ्या नारिंगी नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढत्या उन्हाळ्याच्या तीव्रतेने ...
खेड : दरवर्षी पावसाळ्यात ओसंडून वाहणाऱ्या आणि अनेकदा पुराचा फटका देणाऱ्या नारिंगी नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढत्या उन्हाळ्याच्या तीव्रतेने दिवसेंदिवस घटत चालली आहे.
नदीपात्रातील पाण्याचा वापर कपडे धुण्यासह जनावरांना पिण्यासाठी करण्यात येतो. मात्र रणरणत्या उन्हामुळे नदीपात्रातील पाणीसाठ्यात वेगाने घट होत चालल्याने भविष्यात पाणीटंचाईचे संकट उभे राहणार आहे.
गतवर्षी पडलेल्या समाधानकारक पावसामुळे पाणीटंचाईची समस्या काहीअंशी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे तहानलेली गावे-वाड्यांना दिलासा मिळाला आहे. पण मुबलक पाऊस पडूनही नारिंगी नदीपात्र कोरडेच पडत चालले आहे. पावसाळ्यात नारिंगी नदी ओसंडून वाहत असते. दरवर्षी पूर येतो. नदीचे पाणी सभोवतालच्या भातशेतीत घुसून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यावर्षीही सलग चार ते पाचवेळा नारिंगी नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊन भातशेतीचीही नासाडी झाली होती. यावर्षी मुबलक पर्जन्यवृष्टीमुळे नारिंगी नदीपात्रात फेब्रुवारीअखेरपर्यंत मुबलक पाणीसाठा होता. गेल्या काही दिवसांतील तीव्र उन्हामुळे सद्यस्थितीत मात्र पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट ओढवण्याच्या शक्यतेने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
नारिंगी नदीपात्र झाडा-झुडपांच्या वेढ्यात अडकले आहे. ही झाडे तोडण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नाही. याशिवाय नदीपात्रात गाळाचे प्रमाणही तितकेच आहे. वास्तविक नदीपात्रातील झुडपे तोडल्यास मुबलक प्रमाणात पाणीसाठा होऊ शकतो, मात्र वर्षानुवर्षे त्याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही.
....................................
khed-photo313
खेड : नारिंगी नदीपात्रातील पाण्याची खालावत चाललेली पातळी.