गणपती सजावट स्पर्धेत मिरजोळेतील दीपक मेस्त्री यांचा देखावा प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:39 AM2021-09-16T04:39:00+5:302021-09-16T04:39:00+5:30
रत्नागिरी : शहरातील ‘कांचन डिजिटल’तर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही ‘गणपती सजावट स्पर्धा २०२१’ ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ...
रत्नागिरी : शहरातील ‘कांचन डिजिटल’तर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही ‘गणपती सजावट स्पर्धा २०२१’ ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शहरानजिकच्या मिरजोळे येथील दीपक मेस्त्री आणि परिवाराने तयार केलेल्या जनाबाई देखाव्याला प्रथम क्रमांक मिळाला. जीवन कोळवणकर (कुवारबाव) यांच्या सौरऊर्जा महत्त्व आणि अजय पारकर (मावळंगे) यांच्या सुंभ सजावट या देखाव्याला अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला.
ही स्पर्धा मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर, उद्योजक प्रसन्न आंबुलकर आणि बांधकाम व्यावसायिक सुरेश गुंदेचा यांच्या सहकार्याने यशस्वी झाली. ऑनलाईन असूनही या स्पर्धेला तालुकाभरातून प्रतिसाद मिळाला. रत्नागिरी तालुक्याबाहेरील चिपळूण, लांजा येथील स्पर्धकांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला. एकूण ६८ स्पर्धकांचे व्हिडीओ प्राप्त झाले. त्यांचे अत्यंत काटेकोर परीक्षण गायक, गीतकार, संगीतकार तसेच मूर्ती कलाकार अभिजित नांदगावकर आणि कांचन डिजिटल टीम यांनी केले.
उर्वरित निकाल असा : विशेष उल्लेखनीय संजय वर्तक (कुवारबाव), प्रशांत पारकर (जुवे). उत्तेजनार्थ : आशिष तरळ (कसोप), ओंकार कांबळे (नवीन दत्तमंदिर, मिऱ्या), रजनीश वासावे (गावडे आंबेरे), जयदीप सावंत (सडामिऱ्या), अनिल गोताड (कोतवडे).
प्रथम क्रमांकाला पाच हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला तीन हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला दोन हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार असून, विशेष उल्लेखनीय देखाव्यांना प्रत्येकी एक हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून पाचशे रुपये व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
‘कांचन डिजिटल गणपती सजावट स्पर्धा २०२१’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा अनंत चतुर्दशीनंतर कोरोनाचे सर्व शासकीय नियमावली रितसर पाळून आयोजित केला जाईल. पुढीलवर्षीही ही स्पर्धा भव्य स्वरूपात घेण्यात येईल. याचबरोबर वर्षभरात इतरही अनेक सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, अशी माहिती आयोजक कांचन डिजिटलचे कांचन मालगुंडकर यांनी दिली.