उपनगराध्यक्ष संजय साळवी यांचा राजीनामा
By admin | Published: February 5, 2016 11:36 PM2016-02-05T23:36:29+5:302016-02-06T00:03:22+5:30
रत्नागिरी नगरपालिका : विनय मलुष्टेना संधी ?
रत्नागिरी : रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष संजय साळवी यांनी शुक्रवारी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्याकडे सादर केला. सव्वा वर्षाची उपनगराध्यक्षपदाची कारकीर्द पूर्ण झाल्यानंतर शिवसेना पक्षनेत्यांच्या आदेशानुसार त्यांनी हा राजीनामा दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
शिवसेनेत आक्रमक तोफ म्हणून ओळखले जाणारे नगरसेवक विनय तथा भैया मलुष्टे यांना उपनगराध्यक्षपदी संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरी पालिकेत भाजप नगराध्यक्ष व सेनेच्या उपनगराध्यक्षांमध्ये विविध मुद्द्यांवरून कलगी-तुरा रंगण्याची चिन्हे आहेत.
रत्नागिरी पालिकेत सव्वाचार वर्षांपूर्वी युतीची सत्ता आल्यानंतर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी प्रत्येकी सव्वा वर्षाचे चार कालावधी निश्चित करण्यात आले होते. मात्र भाजपचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी युती तुटल्याने पद सोडले नाही. असे असले तरी संजय साळवी यांनी मात्र सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण करून पदाचा राजीनामा दिला आहे.
आता भाजपने
शब्द पाळावा...!
शिवसेनेने आपला शब्द पाळला आहे. संजय साळवी यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता भाजपनेही त्यांच्या नगराध्यक्षांचा राजीनामा घ्यावा व नगराध्यक्षपद शिवसेनेला मोकळे करून द्यावे. तसे करून भाजपने आपला शब्द पाळावा, तरच पुढील पालिका निवडणुकीत युतीची शक्यता आहे, असे मत सेनेच्या काही नेत्यांनी व्यक्त केले.
राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे
सेनेचे संजय साळवी यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा शुक्रवारी दुपारी आपल्याकडे दिला आहे. हा राजीनामा मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जात असल्याची माहिती नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी दिली. येत्या आठवडाभरात नवीन उपनगराध्यक्ष निवड होणे अपेक्षित आहे.