खेड : पोसरे येथे दरड कोसळून सतरा ग्रामस्थांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते मदत व अन्नधान्य वाटप करण्यात आले. दरडप्रवण क्षेत्रातील लोकांचे पुनर्वसन करण्याची घोषणाही त्यांनी केली.
तालुक्यातील पोसरे येथे दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या वारसांना शासनातर्फे प्रत्येकी चार लाख रुपये मदतीचे धनादेश गुरुवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात मृतांच्या वारसांना हे धनादेश देण्यात आले. तसेच खेड तालुक्यातील बीरमणी येथे मृत्यू पावलेल्या दोन व्यक्तींच्या वारसांना धनादेश वितरित करण्यात आले.
यावेळी ॲड. परब म्हणाले की, दरड प्रवण क्षेत्रातील ग्रामस्थांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणे, ही काळाची गरज बनली आहे. यासाठी अशा क्षेत्रातील लोकांचा सकारात्मक प्रतिसादही आवश्यक आहे. दरड प्रवण क्षेत्रातील वस्त्यांची यादी तयार करून त्यांची म्हाडाच्या माध्यमातून सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था होण्याबाबतची योजना तयार करण्यात येईल. पालकमंत्री म्हणून ही जबाबदारी आपण स्वीकारतो, असेही त्यांनी सांगितले.