लांजा : पोलीस दलामार्फत दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या ग्राम दत्तक योजनेंतर्गत लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने खेरवसे व माजळ या दत्तक गावांतील २० कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, लांजा उपविभागीय अधिकारी निवास साळुंखे तसेच राजेश कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी खेरवसे व माजळ या दोन गावांमध्ये जाऊन देखभाल करत आहेत.
लांजा उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले आय कॉप युनिट, लांजाचे पोलीस अंमलदार सुनील पडळकर, सुयोग वाडकर, अविनाश भोसले, महेश जगताप हे काम करत आहेत. रविवारी आय काॅप युनिटतर्फे ग्राम दत्तक गाव खेरवसे व माजळ गावांमध्ये वीस कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटण्यात आले. हे किट मुस्लिम वेल्फेअर सोसायटी, लांजा संघटनेकडून देण्यात आलेले असून, किट वाटप कार्यक्रमावेळी मुस्लिम वेल्फेअर सोसायटी, लांजा यांचे कार्याध्यक्ष अखिल नाईक, सचिव राजू नाईक, युवाध्यक्ष नासिर मुजावर, उपाध्यक्ष सरफराज मुकादम तसेच लांजा युनिटचे पोलीस अंमलदार सुनील पडळकर, वाडकर व दोन्ही गावांमधील स्वयंसेवक ग्राम कृती दलातील सदस्य व सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.