लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुली, अनुसूचित जाती, जमाती व दारिद्र्य रेषेखालील मुले यांना दरवर्षी मोफत दोन गणवेश देण्यात येतात. मात्र, यावर्षी जिल्ह्यातील एकूण ५२ हजार ९२० विद्यार्थ्यांसाठी केवळ एका गणवेशासाठी १ कोटी ६७ लाख ६३ हजार रुपये इतकाच निधी प्राप्त झाला असून प्राप्त निधीतून गणवेश वितरणाचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे.
पहिली ते आठवीपर्यंत सर्व मुली, एस.सी., एस.टी. व दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी मुलांना व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गणवेश वितरित करण्यात आले आहेत. गणवेशासाठी निधी तोकडा असल्याने चांगल्या दर्जाचे कापड तसेच सातवी ते आठवीपर्यंत मुली- मुलांना स्कर्ट, टाॅप किंवा हाफ पँट-शर्टऐवजी सलवार कमीज किंवा फूल पँट-शर्ट देताना शाळांना स्वत: खर्च करावा लागला.
मुख्याध्यापकांच्या तक्रारी काय?
- पहिली ते चाैथीपर्यंतची मुले घरी असल्याने पालकांना निरोप पाठवून घ्यावी मापे लागली.
- दरवर्षी दोन गणवेश मात्र यावर्षी एकच गणवेश असल्याने पालकांमध्ये नाराजी.
- विद्यार्थ्यांची उंची, शरीरयष्टीमध्ये फरक असल्याने तोकड्या निधीत खर्च करणे अशक्य होते.
- सरसकट निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, त्यामध्ये चांगल्या दर्जाचे गणवेश खरेदी करण्यासाठी कसरत करावी लागते.
पाचवी ते आठवीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग जानेवारीपासून सुरू झाले. शासनाकडून केवळ एकाच गणवेशाची रक्कम उपलब्ध झाली. त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करून वितरित करण्यात आले आहेत.
- संतोष रावणग, मुख्याध्यापक भातगाव (गुहागर)
जिल्हा परिषदेकडून निधी प्राप्त होताच प्रत्येक लाभार्थी पालकांना बोलावून त्यांच्यामार्फत मुलांची गणवेशासाठी मापे घेऊन वेळेवर गणवेशांचे वाटप करण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने मुलांना गणवेशांचे वितरण करण्यात आले.
- सुहास भितळे, मुख्याध्यापक, उक्षी (बनाचीवाडी), रत्नागिरी.