माचाळवासीयांना भाजीपाला बियाण्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:31 AM2021-03-31T04:31:56+5:302021-03-31T04:31:56+5:30
लांजा : माचाळ मुचकुंदी पर्यटन विकास सेवा सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विवेक सावत यांनी माचाळवासीयांना आपल्या घराच्या परिसरामध्ये भाजीपाला ...
लांजा : माचाळ मुचकुंदी पर्यटन विकास सेवा सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विवेक सावत यांनी माचाळवासीयांना आपल्या घराच्या परिसरामध्ये भाजीपाला तयार करून आपली उपजीविका चालविण्यासाठी भाजी बियाण्याचे मोफत वाटप केले.
माचाळच्या पर्यटन विकासाठी स्थापन झालेल्या संस्थेचे संंस्थापक अध्यक्ष विवेक सावंत माचाळवासीयांसाठी संस्थेच्या माध्यमातून नेहमी माचाळ गावात सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवीत असतात. त्यांनी कोरोना काळात जीवनावश्यक वस्तू व किराणा माल, औषधे, ऑक्सिमीटर अशा गोष्टींचे वाटप केले होते. कोकण कॄषी विद्यापीठाच्या साहाय्याने भाजीपाला मिनी कीटचे वाटप केले होते. आता गावात होळीनिमित्त भेट देताना त्यांनी पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून बी-बियाण्यांचे वाटप केले आहे. त्यामध्ये नऊ प्रकारची बियाणे आहेत. परसबागेत लोकांनी भाजीपाला करावा व त्यातून स्वतःची गरज भागवून उरलेला विक्री करावा, असा उद्देश आहे.
यामध्ये भेंडी, भोपळा, मुळा, शिराळी, वांगी, पालक, मिरची, चवळी, घेवडा अशा विविध बियाण्यांचा समावेश आहे.
माचाळमध्ये रस्ता झाला म्हणजे विकास नव्हे. त्या रस्त्यावरून दूध, भाजीपाला, अंडी यांची विक्री होईल आणि शेतकरी सधन होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने विकास झाला असे म्हणता येईल, असे विवेक सावंत यांनी यावेळी सांगितले.