रत्नागिरीत 24 फेब्रुवारीपासून जिल्हा कृषि महोत्सव व पशु-पक्षी प्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 02:24 PM2018-02-15T14:24:53+5:302018-02-15T14:26:01+5:30
महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २८ फेब्रुवारीपर्यंत प्रमोद महाजन क्रीडा संकुल ( रत्नागिरी )येथे जिल्हा कृषी महोत्सव व पशु-पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी - महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २८ फेब्रुवारीपर्यंत प्रमोद महाजन क्रीडा संकुल ( रत्नागिरी )येथे जिल्हा कृषी महोत्सव व पशु-पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शेतक-यांना शासनाच्या विविध योजना, उपक्रमांची माहिती देणे, संशोधन कृषि तंत्रज्ञान व प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, धान्य व खाद्य महोत्सवाद्वारे थेट विक्रीला चालना देणे, यासाठी राज्यातील ३४ जिल्ह्यात दरवर्षी पाच दिवसांचा जिल्हा कृषि महोत्सव साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यासाठी प्रतिजिल्हा १४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
आंबा आणि काजू प्रक्रियेचे स्वतंत्र दालन प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. खते, कीटकनाशके व बियाणी यांचे दालन उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, धान्य महोत्सव बचत गटांच्या उत्पादनाची विक्री व प्रदर्शन, शेतकरी यंत्र व अवजारे दालन, विविध जातींच्या पशु-पक्ष्यांचे प्रदर्शन यांसारखे एकूण २०० स्टॉल प्रदर्शनाच्या निमित्ताने मांडण्यात येणार आहेत. प्रदर्शनाचे औचित्य साधून तालुक्यातील प्रत्येकी दोन मिळून एकूण १८ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कृषीविषयक परिसंवाद व चर्चासत्र तसेच विक्रेता व खरेदीदार संमेलन भरविण्यात येणार आहे. रत्नागिरी येथे कार्यरत असणा-या एक्झॉटिक कंपनीचे दालन प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. फळप्रक्रिया करणारी ही कंपनी असून, प्रक्रियेसाठी लागणारा ८० टक्के आंबा परराज्यातून विकत घेते. यावर्षीपासून जिल्ह्यातील आंबा विक्रीला घेण्याची सूचना कंपनीला केली जाणार आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या आंब्याला चांगला भाव देण्यात यावा, अशी मागणी केली जाणार असल्याचे आमदार सामंत यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रात बर्ड फ्लूची लागण झालेली नाही. कर्नाटक व अन्य राज्यात याचा प्रसार झाला आहे, अशी माहिती पशु विभागातर्फे देण्यात आली. यावेळी विभागीय कृषी अधिकारी आरीफ शहा, जिल्हा उपविभागीय कृषी अधीक्षक एस. एस. जगताप उपस्थित होते.