पूरग्रस्त व्यापाऱ्यांना जिल्हा बॅंक ५ टक्के दराने कर्ज देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:32 AM2021-07-28T04:32:51+5:302021-07-28T04:32:51+5:30
रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष डाॅ. तानाजीराव चोरगे यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त व्यापाऱ्यांची सकाळी बैठक झाली. या व्यापाऱ्यांना ...
रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष डाॅ. तानाजीराव चोरगे यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त व्यापाऱ्यांची सकाळी बैठक झाली. या व्यापाऱ्यांना लवकरात लवकर उभे राहण्याची संधी मिळावी, यासाठी जिल्हा बॅंकेकडून ५ टक्के दराने कर्जपुरवठा केला जाईल, असे डाॅ. चोरगे यांनी जाहीर केले असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आणि चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी मंगळवारी संयुक्तरीत्या ऑनलाइन आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ढगफुटीसदृश झालेल्या अतिवृष्टीत चिपळुणात महाप्रलय आला. खेडही जलमय झाले. यात व्यापारी यांचे पूर्णत: नुकसान झाले असून, त्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त झाला आहे. जिल्ह्यात सुमारे साडेसहा हजार छोटे मोठे व्यापारी पूरग्रस्त झाले आहेत. त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी अल्पदराने कर्ज मिळण्याची गरज असल्याने तशी मागणी या व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या आनुषंगाने या तिघांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. व्यापाऱ्यांना सध्या अल्प व्याजदराने ५० हजार ते ५० लाखापर्यंत कर्जाची गरज आहे. त्यांना उभे राहण्यासाठी अल्प व्याजदर आणि सबसिडी शासनाकडून मिळाली तर या व्यापाऱ्यांना लवकरात लवकर आपले व्यवसाय सुरू करता येणार आहेत. यादृष्टीने आयोजित या बैठकीत डाॅ. चोरगे यांनी प्रतिसाद दिल्याने त्यांना धन्यवाद देण्यात आले.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असून, या व्यापाऱ्यांना २ टक्के दराने कर्ज सबसिडी मिळाल्यास त्याचा फायदा राज्यातील इतर पूरबाधित व्यापाऱ्यांनाही होईल. तसेच १ वर्षांचा माॅरेटियम लागू केल्यास त्यांना लवकर उभ राहता येईल. इतर राष्ट्रीय बॅंकांनीही हा फाॅर्म्युला लागू करावा, यासाठी इतर बॅंकांशीही याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. यासाठी सुलभ यंत्रणा उभारून वेगळा कक्ष उभारण्याची मागणीही करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
चिपळूण पूर्वपदावर येत आहे. ९० ते ९५ टक्के वीजपुरवठा मंगळवारी पूर्ववत होईल. स्थिती सुधारायला पाच-सहा दिवस लागतील. रोगराई पसरू नये, याबाबतची दक्षता घेण्यात येत आहे. तिथला चिखल काढण्याचे काम प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे पदाधिकारी करीत आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
मुंबई-गोवा महामार्गावरील भराव दूर करण्यात आला असून, हलक्या वाहनांची वाहतूक सोमवारपासून सुरू झाली आहे. दोन दिवसांत जड वाहतूकही सुरू होईल, अशी माहितीही खासदार विनायक राऊत यांनी यावेळी दिली.