चिपळूण उपनगराध्यक्षांविरोधात अविश्वास, महाविकास आघाडीला अखेर यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 07:30 PM2020-12-19T19:30:55+5:302020-12-19T19:35:32+5:30
नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांना बडतर्फ करण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडीने अखेर उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर करण्यात यश मिळवले आहे.
चिपळूण : नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांना बडतर्फ करण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडीने अखेर उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर करण्यात यश मिळवले आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या विशेष सभेत महाविकास आघाडीच्या २२ नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर केला. भोजने यांचा दोष दाखवा, अशी भाजप नगरसेवकांची मागणी थेट मतदानामुळे आपोआपच फेटाळली गेली.
महाविकास आघाडीच्या २२ नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष भोजने यांच्यावर अविश्वास ठरावासाठी विशेष सभेची मागणी केली होती. गुरुवारी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.
सभेच्या सुरुवातीलाच भाजपचे स्वीकृत नगरसेवक विजय चितळे यांनी आघाडीचा अविश्वास ठराव फेटाळून लावण्याची मागणी केली. भोजने यांच्याविरोधात कोणताही ठोस आरोप नाही. त्यांनी कोणता गैरव्यवहार किंवा गैरवर्तनाचा ठोस पुरावाही नाही. केवळ बहुमत आहे म्हणून उन्मत्त होऊन ठराव करता येणार नाही. त्यांचा परिपूर्ण प्रस्ताव येईपर्यंत हा प्रस्ताव स्वीकारु नये, अशी मागणी चितळे यांनी केली.
नगरसेवक मोहन मिरगल, राजेश केळसकर, शशिकांत मोदी, सुधीर शिंदे व बिलाल पालकर यांनी स्पष्टीकरण करण्याची गरज नाही किंवा कायद्यातही तशी तरतूद नसल्याचे सांगितले. मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार अखेर अविश्वास ठराव मांडण्यात आला.
ऐतिहासिक ठराव
चिपळूण नगर परिषदच्या इतिहासात आजपर्यंत असा अविश्वास ठराव मांडण्यात आला नव्हता. या सभेला उपनगराध्यक्ष भोजने अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितच नगरसेवक केळसकर यांनी ठराव मांडला. त्याला नगरसेविका फैरोजा मोडक यांनी अनुमोदन दिले. महाविकास आघाडीतर्फे २२, तर ठरावाविरोधात ४ मते पडली.
मागणी पत्राचे वाचन नाहीच
या सभेवर भोजने यांनी आक्षेप घेतला होता. ही सभा रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. बाजू मांडण्याची संधी न देता, कायदेशीर नोटीस न पाठवता अविश्वास ठरावावर मतदान करण्यासाठी थेट विशेष सभा बोलावणे बेकायदेशीर आहे. याबाबत अनेक प्रश्न भोजने यांनी उपस्थित केले होते. मात्र, त्यांच्या पत्राचे वाचन झाले नाही.