लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : मुंबईत कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे तेथून येणाऱ्यांमुळे कोरोना संसर्ग वाढणार नाही, तरी गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची कोरोना चाचणी करू नका, अशा सूचना आपण जिल्हा प्रशासनाला केल्याची माहिती आमदार भास्कर जाधव यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
एकीकडे गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रशासनाकडून कोरोना चाचणीचा अहवाल अथवा दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर, त्यामध्ये बदल करत गावातच चाचणी करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र संभ्रम असतानाच, सोमवारी आमदार जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कुठेही रस्त्यात थांबवून त्यांची आरटीपीसीआर चाचणी किंवा अँटिजन चाचणी केली जाणार नाही. त्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक किंवा पिळवणूक केली जाणार नाही. याबाबतची स्पष्ट चर्चा स्थानिक जिल्हा प्रशासनाशी करण्यात आलेली आहे, शिवाय कोकणात आल्यावर कोणती अडचण आल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही जाधव यांनी केले आहे.