रत्नागिरी : दादर प्राथमिक आरोग्य केंद्राला डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:45 AM2018-03-10T11:45:28+5:302018-03-10T11:45:59+5:30
दादर (ता. चिपळूण) प्राथमिक आरोग्य केंद्राला जाहीर झालेल्या ‘डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार’चे वितरण गुरुवारी कोकण परिक्षेत्र, नवी मुंबईचे पोलीस अधीक्षक सुरेश मेंगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
चिपळूण : दादर (ता. चिपळूण) प्राथमिक आरोग्य केंद्राला जाहीर झालेल्या ‘डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार’चे वितरण गुरुवारी कोकण परिक्षेत्र, नवी मुंबईचे पोलीस अधीक्षक सुरेश मेंगडे यांच्या हस्ते करण्यात आले. चिपळूणच्या तालुका आरोग्य अधिकारी व दादर केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव व सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
कुंबळे (ता. मंडणगड) प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम, दादर (ता. चिपळूण) आरोग्य केंद्राला द्वितीय तर कडवई (ता. संगमेश्वर) प्राथमिक आरोग्य केंद्राला तृतीय क्रमांक प्रदान करण्यात आला. तर खरवते (ता. चिपळूण) केंद्राला ‘कायाकल्प योजने’चा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तालुका अधिकारी डॉ. ज्योती यादव या दादर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र मोरे, आरोग्य पर्यवेक्षक राजेंद्र मोलाज, ए. जी. शिंदे, जयश्री राणे, मुग्धा केसरकर, आरोग्यसेवक प्रफुल्ल केळस्कर, शंकर घाणेकर, श्वेता मांडवकर, ए. ए. देसाई, अर्चना सुर्वे, प्रज्ञा जाधव, तन्वी सावर्डेकर, प्रियांका शिंदे हे येथे कार्यरत आहेत.
या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दामणे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा परिषद अध्यक्ष स्नेहा सावंत, उदय बने, श्रीकांत कुलकर्णी उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य दीप्ती महाडिक, विनोद झगडे, पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे, धनश्री शिंदे, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, अशोक कदम यांनी अभिनंदन केले आहे.