कोर्ले येथे नदीत बुडून दोघांचा मृत्यू
By admin | Published: May 7, 2017 11:41 PM2017-05-07T23:41:47+5:302017-05-07T23:41:47+5:30
कोर्ले येथे नदीत बुडून दोघांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
लांजा : लग्नाची फोटोग्राफी करण्यासाठी तालुक्यातील कोर्ले येथे मुंबईहून आलेल्या चार युवकांपैकी दोन युवकांचा नदीच्या पात्राचा अंदाज न आल्याने बुडुन मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
तालुक्यातील कोर्ले गावातील अरुण महिपत साळुंखे यांच्याकडे सोमवारी (दि. ८ मे) विवाहसमारंभ आहे. या सोहळ्याची फोटोग्राफी करण्यासाठी मुंबईहून बंडू रमेश जाला (वय १९) व मुकेश पालाजी मकवाणा (३२, दोघेही जोगेश्वरी, मुंबई) व त्यांचे साथीदार अल्पेश रमेश परमार व रणजित शैलेश रॉय (जोगेश्वरी) हे रविवारी सकाळी ९ वाजता कोर्ले येथे आले होते. त्यानंतर हे चौघेजण जवळच असलेल्या मुचकुंदी नदीवर जांगलदेव कातळकोंड येथे सकाळी १० वाजता पोहण्यासाठी गेले होते. त्यामधील बंडू जाला व मुकेश मकवाणा हे दोघे नदीच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने व पोहता येत नसल्याने बुडू लागले. त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्र अल्पेश व रणजित यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना हे दोघे मित्र किती खोल पाण्यात गेले याचा अंदाज न आल्याने भयभीत होऊन त्यांनी आरडाओरड सुरू केली.
जवळून जाणाऱ्या एका रिक्षावाल्याने ही घटना पाहिली. आपल्या जिवाची पर्वा न करता त्याने नदीमध्ये उडी मारून दोघांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. नदीच्या पाण्यामध्ये गुदमरून त्यांचा मृत्यू ओढवला होता. याबाबतची माहिती मिळताच, अरुण साळुंखे यांनी आपल्या सहकारी व गावकऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली व तेथून या दोन्ही युवकांना घेऊन भांबेड प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोहर चिखली, हेडकॉन्स्टेबल सुनील चवेकर, शशिकांत सावंत, राजेंद्र पवार, चालक सतिश साळवी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
येगाव येथे एकाचा बुडून मृत्यू
भाचीच्या लग्नाला आलेल्या मामाचा नदीत बडून मुत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ८़१५ वाजण्याचा सुमारास संगमेश्वर तालुक्यातील येगाव येथे घडली़
सुनील भागूराम पवार असे त्यांचे नाव असून या घटनेची नोंद सावर्डे पोलीस स्थानकात करण्यात आली आहे़ सुनील पवार हे वंदना विजय जाधव (येगाव) हिच्या मुलीच्या लग्नसमारंभासाठी येगाव येथे आले होते़