रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर रविवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास खेडच्या दिशेने घाटरस्त्यात चढणारा कंटेनर अचानक मागील बाजूने घसरू लागल्याने महामार्गावर तिरका उभा राहिला. यामुळे कशेडी घाटातील वाहतूक तब्बल तीन तासांपेक्षा अधिक काळ एकेरी ठेवण्यात आली. परिणामी, शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकडून कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचा मोठा खोळंबा झाल्याचे दिसून आले.कशेडी घाटातील येलंगेवाडी भोगाव येथील तीव्र वळणाच्या चढया घाटरस्त्यावरून सकाळी ९ वाजल्यानंतर एक अवाढव्य कंटेनर खेडच्या दिशेने निघाला असता अचानक वळणावर वेग कमी झाल्याने मागील बाजूने उतारावरून दरीच्या दिशेने घसरू लागला. यामुळे संपूर्ण मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हा कंटेनर तिरका उभा राहून कंटेनरकडून रस्ता अडविला गेला. यामुळे मुंबईकडून कोकणाकडे निघालेल्या मुंबईकरांच्या वाहनांना रस्त्याच्या साईडपट्टीवरून सावकाश खेडच्या दिशेने मार्गक्रमण करावे लागले तर खेडकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना समोरून येणारी वाहने थांबवून संधी दिली जात होती. परिणामी, सुमारे दोन अडीच तास याठिकाणी एकेरी वाहतूक सुरू राहून वाहतुकीचा खोळंबा झाला.पोलादपूर पोलिसांसह राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलीस कशेडी टॅप यांनी यावेळी वाहतुकीचा कोंडी वाढून अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रयत्न केले. दुपारी बारा वाजल्यानंतर याठिकाणी कंटेनर सरळ करून खेडकडे रवाना करण्यात आल्याने हा वाहतुकीचा खोळंबा होण्याचा प्रकार थांबला. मात्र, दोनच दिवसांनी सुरू होणाऱ्या शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांची कशेडी घाटामध्ये चांगली रखडपट्टी झाली.
कशेडी घाटात कंटेनर घसरल्याने शिमगोत्सवासाठी येणारे मुंबईकर रखडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 5:29 PM