कडक लॉकडाऊनमुळे एस.टी. बंद, मात्र खासगी वाहतूक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:24 AM2021-06-02T04:24:30+5:302021-06-02T04:24:30+5:30
राजापूर : तालुक्यातून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी राजापूर आगारातून गत सप्ताहात सुरू करण्यात आलेल्या राजापूर बोरिवली व ...
राजापूर : तालुक्यातून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी राजापूर आगारातून गत सप्ताहात सुरू करण्यात आलेल्या राजापूर बोरिवली व राजापूर नालासोपारा अर्नाळा या बसेस ३ जूनपासून सुरू होणाऱ्या कडक लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, लॉकडाऊनमध्ये एस.टी. वाहतूक बंद असताना काही खासगी वाहतूकदार मात्र राजरोसपणे प्रवासी वाहतूक करत आहेत. त्यामुळे संतप्त भावना व्यक्त हाेत असून, एस.टी. आणि एस.टी़.तून प्रवास करणाऱ्यांमुळेच काेराेनाचा संसर्ग हाेताे का, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत यापूर्वी व आताही मुंबईतून कोकणात येणाऱ्या आणि कोकणातून मुंबईत जाणाऱ्या कोकणी जनतेची गैरसोय होत आहे. खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून १५०० ते २००० रुपये तिकीट दर आकारून प्रवाशांची लूट केली जात आहे. मात्र, याबाबत प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. खासगी प्रवासी वाहतूकदार लाॅकडाऊनमध्ये दामदुप्पट तिकीट दर आकारून आपली पाेळी भाजून घेत आहेत.
राजापूर आगारातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी राजापूर - बोरिवली व राजापूर - नालासोपारा - अर्नाळा या दोन गाड्या सुरू केल्या होत्या. कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रसंगी प्रवाशांच्या सेवेसाठी तोटा सहन करून एस.टी़.ने ही वाहतूक सुरू केली होती. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र, ३ जूनपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या एस.टी़. बस सेवा बंद ठेवण्याचे आदेश आगार प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन्ही गाड्या मंगळवारपासूनच बंद करण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामीण भागात पाचल आणि नाटे भागात सुरू करण्यात आलेल्या दोन्ही फेऱ्याही बंद करण्यात आल्या आहेत. आता केवळ राजापूर, रत्नागिरी मार्गावरच दिवसभरात सहा बसेस सोडण्यात येत आहेत. लाॅकडाऊनमध्ये एस.टी. सेवा बंद असली तरी, खासगी वाहतूक सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.